धक्कादायक! लातूर जिल्ह्यात शाळकरी मुलाचा ठेचून खून; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2024 19:54 IST2024-01-13T19:53:56+5:302024-01-13T19:54:30+5:30
धक्कादायक : उदगीर तालुक्यातील कुमठा येथील घटना

धक्कादायक! लातूर जिल्ह्यात शाळकरी मुलाचा ठेचून खून; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
उदगीर (जि. लातूर) : १४ वर्षीय शाळकरी मुलाचा ठेचून खून करण्यात आला असून, चेहरा विद्रूप करून पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना उदगीर तालुक्यातील कुमठा गावात शनिवारी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, उदगीर तालुक्यातील कुमठा शिवारात चंद्रभान विठ्ठल केंद्रे यांच्या शेताच्या बांधावर संतोष गोविंद घुगे (वय १४, रा. कुमठा, ता. उदगीर) या शाळकरी मुलाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केला. मयत मुलाची ओळख पटू नये यासाठी चेहरा ठेचून विद्रूप करण्यात आला. शिवाय, डोक्याचे केस कापून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत मयत मुलाचे वडील गोविंद तुकाराम घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार करीत आहेत.