लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची नवी ‘केमिस्ट्री’; तर महायुतीमध्ये फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:41 IST2025-12-30T19:40:36+5:302025-12-30T19:41:07+5:30
वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही जाहीर चर्चा समोर येऊ न देता, शेवटच्या क्षणी काँग्रेसने फॉर्म्युला निश्चित केला.

लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची नवी ‘केमिस्ट्री’; तर महायुतीमध्ये फूट
लातूर: लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय समीकरणांनी पूर्णपणे कूस बदलली आहे. सत्तेसाठी सोयीचे राजकारण करताना अनेक वर्षांची 'दोस्ती' तुटली असून, एकमेकांचे हात धरणाऱ्या पक्षांनी आता एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. सत्ताधारी भाजपप्रणीत महायुतीमध्ये जागावाटपावरून एकमत न झाल्याने भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना आता स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने नवीन समीकरण जुळले आहे.
एकीकडे महायुती फुटलेली असताना, काँग्रेसने मात्र अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही जाहीर चर्चा समोर येऊ न देता, शेवटच्या क्षणी काँग्रेसने ६५ आणि वंचितने ५ जागा लढवण्याचा फॉर्म्युला निश्चित केला. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने टाकलेले हे पाऊल भाजपसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
महाविकास आघाडीचीही शकले
केवळ महायुतीतच नाही, तर महाविकास आघाडीतही गोंधळाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धव सेना काही महत्त्वाच्या जागांवर स्वतंत्रपणे लढत आहेत. यामुळे लातूरमध्ये आता चौरंगी-पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा आणि नवीन चेहऱ्यांची महत्त्वाकांक्षा यामुळे प्रत्येक प्रभागात चुरस निर्माण झाली आहे.
आता चेंडू मतदारांच्या कोर्टात
महायुतीच्या तीन पक्षांमधील फूट आणि काँग्रेस-वंचितची युती यामुळे लातूरचा महापौर कोण होणार, हे सांगणे आता कठीण झाले आहे. या 'मल्टिस्टार' लढतीत कोण कोणाची मते खाणार आणि कोणाचे नशीब उघडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.