लातुर मनपा निकाल: काँग्रेस-वंचित आघाडीचे चाैघे विजयी, ८ आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:42 IST2026-01-16T11:41:33+5:302026-01-16T11:42:25+5:30
लातूर महापालिकेत काँग्रेस- वंचितची आघाडी आहे.

लातुर मनपा निकाल: काँग्रेस-वंचित आघाडीचे चाैघे विजयी, ८ आघाडीवर
- हरी मोकाशे
लातूर : लातूर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीस शुक्रवारी सकाळी १० वाजता महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रारंभ झाला आहे. प्रभाग १३ मधील वंचितचे अमोल लांडगे, काँग्रेसचे पप्पू देशमुख, कमल सोमवंशी आणि शाहीन मनियार ह्या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.
बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. एका निवडणूक अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा टेबल मतमोजणीसाठी आहेत. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे.
लातूर महापालिकेत काँग्रेस- वंचितची आघाडी आहे. प्रभाग क्र. ४, प्रभाग ७, प्रभाग क्र. १० या तीन प्रभागातील काँग्रेस- वंचित आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग १६ मध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
अशी सुरू आहे मतमोजणी..!
एकावेळी एका प्रभागाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी करतील. एका अधिकाऱ्याकडे ३ प्रभागांच्या मतमोजणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका वेळी एक प्रभाग याप्रमाणे सहा प्रभागांची मतमोजणी केली जाईल. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी दहा टेबल असतील. असे एकूण ६० टेबल राहतील. ४४५ एवढे मनुष्यबळ मतमोजणीसाठी आहे. दोन ते तीन राऊंड मतमोजणीचे होणार आहेत.