लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:00 IST2026-02-06T16:59:28+5:302026-02-06T17:00:02+5:30
राष्ट्रवादीनंतर आता भाजपही वंचित बहुजन आघाडीला पाठबळ देण्याच्या तयारीत

लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने
लातूर : महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र लढलेले काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आता महापौर व उपमहापौर निवडीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच स्वत: अर्ज दाखल न करता राष्ट्रवादी आणि भाजपने वंचितला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्याने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीचे राजकारण रंगणार आहे.
सभागृहात भाजपकडे २२ नगरसेवक असूनही त्यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वंचितचा उमेदवार महापौर, उपमहापौर निवडणुकीत कायम राहिला तर भाजपचा वंचितला पाठिंबा राहील, असे म्हटले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकानेही ‘वंचित’ला पाठिंबा जाहीर केला आहे.
उमेदवारी अर्जांचे गणित..!
९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
काँग्रेसकडून : महापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर पदासाठी ॲड. स्नेहल उटगे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून : महापौरपदासाठी निकिता सोमवंशी आणि उपमहापौरपदासाठी सचिन गायकवाड मैदानात आहेत.
सभागृहातील बलाबल...!
लातूर महापालिकेत सत्तेच्या चाव्या सध्या काँग्रेसच्या हातात सुरक्षित दिसत आहेत, मात्र मित्रपक्षाने दिलेले
आव्हान लक्षवेधी आहे :
काँग्रेस : ४३
भाजप : २२
वंचित बहुजन आघाडी : ०४
राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
निवडणुकीची प्रक्रिया आणि पेच..!
९ फेब्रुवारी रोजी सकाळी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या अर्ध्या तासाचा अवधी दिला जाणार आहे. या अर्ध्या तासात नेमकी काय ‘राजकीय खलबते’ होतात, यावर संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. जर अर्ज मागे घेतले नाही, तर हात वर करून मतदान प्रक्रियेद्वारे नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाईल.
मैत्री की लढत..?
निवडणुकीपूर्वी हातात हात घालून चालणारे हे दोन पक्ष सत्तेच्या वाटणीत मात्र ‘आमने-सामने’ आले आहेत. हा केवळ एक दबावतंत्राचा भाग आहे की खरोखरच या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली आहे, याचे उत्तर ९ फेब्रुवारीलाच मिळेल. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचे पारडे जड असले, तरी ‘वंचित’ने दिलेले आव्हान अन् भाजप, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची उडी निवडीत रंग भरणार आहे.