लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान
By हरी मोकाशे | Updated: May 7, 2024 14:10 IST2024-05-07T14:09:03+5:302024-05-07T14:10:29+5:30
तहसीलदार सुरेखा स्वामी या तात्काळ गावात दाखल झाल्या आणि त्यांनी समजूत काढत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान
लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातील जळकोट तालुक्यातील मेवापूर येथील युवा मतदारांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी मतदारांची समजूत काढल्यानंतर सकाळी ११ वाजल्यानंतर मतदानास सुरुवात झाली.
जळकोट तालुक्यातील मेवापूर येथे पाणी, रस्ता अशा मुलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे. परंतु, समस्या निकाली निघाल्या नाहीत, असे म्हणत गावातील युवा मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी या तात्काळ गावात दाखल झाल्या आणि त्यांनी समजूत काढत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे सकाळी ११ वा. नंतर मतदानास सुरुवात झाली. तसेच डोंगरकोनाळी, केकत सिंदगी, जळकोट शहरातील श्री गुरुदत्त विद्यालय येथील मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दीड तास उशिराने मतदानास सुरुवात झाली.