Ichalkaranji Municipal elections 2026: इचलकरंजी 'मँचेस्टर सिटी'ला गतवैभव मिळवून देऊ; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:02 IST2026-01-12T16:02:15+5:302026-01-12T16:02:45+5:30
स्वच्छ, मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध

Ichalkaranji Municipal elections 2026: इचलकरंजी 'मँचेस्टर सिटी'ला गतवैभव मिळवून देऊ; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
इचलकरंजी : शहराचा "भारताचे मँचेस्टर" असा लौकिक सर्वदूर आहे. वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत असल्यामुळे या मँचेस्टरची रया गेली आहे. या शहराला गतवैभव मिळवून देण्याची ताकद आणि शक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराला "मँचेस्टर सिटी" हा लौकिक मिळवून देऊ, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे दिली. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गणेशनगरला जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार अशोकराव जांभळे अध्यक्षस्थानी होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी शहराचा प्रभागनिहाय विकास होईल. सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील. वृद्ध निराधार दिव्यांगांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, बेघरांना मजबूत पक्की घरे, आरोग्याच्या योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. माजी आमदार जांभळे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्या सहयोगातून इचलकरंजीच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, तौफिक मुजावर, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, उमेदवार माजी आमदार अशोकराव जांभळे, प्रियदर्शनी बेडगे, शिवाजी शिंदे, मनाली नंदूरकर यांच्यासह कार्याध्यक्ष अमित गाताडे, माजी नगरसेवक राजू खोत, विद्या जांभळे, संगीता खोत, जयदीप जांभळे, दिलीप खोत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नितीन जांभळे यांना श्रद्धांजली....
मंत्री मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास केला आहे. नितीन जांभळे हयात असते तर या प्रभागाची निवडणूक बिनविरोधच झाली असती. त्यांच्यासारख्या अजातशत्रू कार्यकर्त्यावर नियतीने घाला घातला. या प्रभागातील सर्वच उमेदवारांचा विजय हीच श्रद्धांजली ठरेल.