Kolhapur Municipal Election: सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत; मंत्री हसन मुश्रीफांचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:42 IST2025-11-15T12:40:47+5:302025-11-15T12:42:40+5:30
महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा

Kolhapur Municipal Election: सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत; मंत्री हसन मुश्रीफांचा भाजपला इशारा
इचलकरंजी : भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. महापालिका निवडणुकीसाठी सन्मानजनक जागा दिल्या, तर चर्चा करा. नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत असतानाच सत्तेत कसे यायचे, याची किमया आपल्याला माहीत असल्याचा इशाराही त्यांनी भाजपला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी मराठा सांस्कृतिक भवनमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्यातील काही लोक दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे यांची शक्ती कमी झाली आहे, असा अंदाज घेऊन आमचे मित्रपक्ष चर्चा करायला लागले, तर त्यांचे गणित चुकल्याशिवाय राहणार नाही. कारण राष्ट्रवादीने सातत्याने सत्तेत कसे यायचे, याची किमया करून दाखवली आहे.
अनेकजण दुसऱ्या पक्षात जाऊनसुद्धा या शहराने पक्षावर प्रेम केले आहे. पक्षातील नेत्यांनी मित्रपक्षांबरोबर चर्चा जिथेपर्यंत करता येते, तिथेपर्यंत करावी. सन्मानजनक जागा द्याव्यात. तुम्हाला जेव्हा आपला सन्मान होत नाही, अपमान होतो, असे वाटल्यानंतर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. चार उमेदवारांचा एक प्रभाग असतो, हे मित्र पक्षाने लक्षात ठेवावे. सगळ्या पक्षांना आपापली गरज असते, हेही लक्षात ठेवावे.
जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी, शहरातील पाणीप्रश्न हाताळण्यासाठी पक्षाने मजबूतपणे रान उठविल्याचे सांगितले. पक्षामध्ये युवक सक्रिय असल्याचे परवेझ गैबान यांनी भाषणात सांगितले. बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, तौफिक मुजावर आदींची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, विलास गाताडे, अमित गाताडे, लतीफ गैबान, बाळासाहेब देशमुख, राजाराम लोकरे, नासीर अपराध, दशरथ माने, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
शहराला स्वच्छ व मुबलक पाणी
शहराला स्वच्छ व प्रदूषित नसलेले पाणी देण्याची मी यापूर्वी ग्वाही दिली आहे. ती जबाबदारी टाळणार नाही. तुम्हाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करेन, असे मुश्रीफ यांनी सांगितले.