Kolhapur: ‘तिलारी’च्या पाण्यावर ‘वारणा नवशक्ती’ करणार जलविद्युत निर्मिती, १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:13 IST2025-07-02T12:12:18+5:302025-07-02T12:13:50+5:30
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

Kolhapur: ‘तिलारी’च्या पाण्यावर ‘वारणा नवशक्ती’ करणार जलविद्युत निर्मिती, १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई/कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेने जलविद्युत निर्मिती क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील पाण्यावर या संस्थेच्यावतीने २४० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार कोरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मंगळवारी सामंजस्य करार झाला. अशा पद्धतीचा उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतात भर घालणारा उपयुक्त प्रकल्प असून सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत असल्याचे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
जलसंपदा विभाग आणि या संस्थेमध्ये विधानभवनात हा करार झाला. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, वारणाचे एन. एच. पाटील, ज्योतिरादित्य विनय कोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पंप स्टोअरेज क्षेत्रात राज्य शासनाचा हा १६ वा सामंजस्य करार आहे.
फडणवीस म्हणाले, पंप स्टोअरेजची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने यासंदर्भात ६५ हजार मेगावॉट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत. पश्चिमी घाटामुळे पंप स्टोअरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी प्राप्त झाली असून, वारणा समूहाने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले तसेच या जलविद्युत प्रकल्पासाठी देखील ते भरीव योगदान देतील.
पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्प म्हणजे काय..?
चंदगड तालुक्यातील तिलारी प्रकल्पातून पाणी खालच्या बाजूला असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील केंद्रे धरणामध्ये सोडले जाईल. हे पाणी सोडताना त्यावर विद्युतनिर्मिती करण्यात येईल आणि पुन्हा हे पाणी तिलारी धरणात उचलून नेण्यात येईल. या प्रकल्पातून ३०० मनुष्यबळ रोजगारनिर्मिती होणार आहे.
महाराष्ट्राने २०२३ मध्ये आणलेले अक्षय ऊर्जा धोरण विशेष उपयोगी ठरणारे असून राज्याच्या हितासाठी दूरगामी परिणाम करणारा आणि काळाच्या पुढचा विचार या धोरणात झाला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग आणि पर्यावरण पूरक असलेल्या उदंचन जलविद्युत प्रकल्पात वारणा समूह सक्रिय सहभाग घेऊन प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देईल. - आमदार विनय कोरे