Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:59 IST2025-12-27T11:58:08+5:302025-12-27T11:59:31+5:30
कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचे सांगून कोल्हापुरातील सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना या नव्या आघाडीत येण्याचे आवाहन केले

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच्या आघाडीवरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष यांनी स्वतंत्र आघाडी करून कोल्हापुरात ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. २६) पत्रकार परिषदेत जाहीर केला. वंचितच्या नेत्यांनी पहले ‘आप’ म्हणत ८१ जागा एकत्रित लढवण्याची घोषणा केली. आपच्या नेत्यांनीही कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचे सांगून कोल्हापुरातील सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना या नव्या आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी यांच्यासोबत बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी यांच्यासारख्या शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा विचार मानणारे समविचारी पक्षही या आघाडीत सहभागी होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे, युवक शहराध्यक्ष अमित नागटिळे, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव आर. के. कांबळे आणि बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कांबळे उपस्थित होते.
शहराच्या विकासाचा मुद्दा समोर ठेवून सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ही आघाडी काम करेल. या आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांना खिंडार पडेल असा विश्वास वंचितचे शहराध्यक्ष अरुण सोनावणे यांनी व्यक्त केला. इतर पक्षांप्रमाणे जागावाटपाचे गुऱ्हाळ न चालवता दोन तासात जागा निश्चित करू, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आता वंचितच्या आघाडीत
महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी चर्चा सुरू केली. अधिकची चर्चा होऊन आज शनिवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होईल जाहीर करण्यात आले. गुरुवारी व्ही. बी. पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याशीही संपर्क साधला होता.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या कार्यालयात त्यासंबंधीची प्राथमिक बैठक झाली. त्यास वंचित महानगराध्यक्ष अरुण सोनवणे व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्यासमवेत सर्व जागांबाबत चर्चा झाली. इतर काही घटक पक्षदेखील आघाडीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांचेसुद्धा काही जागेवर स्वागत केले जाईल, असे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी व आपबरोबर चांगली चर्चा झाली असून, इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षसुद्धा आमच्याबरोबर येण्यास इच्छुक आहेत. त्यांनाही सोबत घेतले जाईल, असे बैठकीत ठरले. बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश निरीक्षक बाजीराव खाडे, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, रोहित पाटील आदी उपस्थित होते.