Kolhapur: कागलमध्ये चारही गट सावध भूमिकेत; महायुती की वेगळा विचार, यावर ठरणार निवडणुकीचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:37 IST2025-07-19T16:36:20+5:302025-07-19T16:37:13+5:30
गावागावात चाचपणी सुरू

Kolhapur: कागलमध्ये चारही गट सावध भूमिकेत; महायुती की वेगळा विचार, यावर ठरणार निवडणुकीचे चित्र
जे. एस.शेख
कागल : जिल्हा परिषद, पंचायत समीतीचे वारे कागल तालुक्यात वाहू लागले आहे. प्रमुख चार राजकीय गट व्यूहरचना निश्चित करण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तालुक्यात तीन प्रमुख गट महायुतीचे घटक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट (मुश्रीफ गट), भाजप (संजयबाबा गट) शिंदेसेना (मंडलिक गट), तर राजे गट महाविकास आघाडीचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून तिन्ही गट एकत्र लढणार की, घटक पक्ष वेगळी भूमिका घेणार यावर निवडणुकीचे चित्र रंगणार आहे.
तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे मतदारसंघ, तर बारा पंचायत समितीचे मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे गटात राजकीय जवळीक आहे. तर, माजी खासदार संजय मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्याशी समान अंतर ठेवून आहेत.
समरजीत घाटगे गट जरी एकाकी दिसत असला, तरी मंडलिक गटाबद्दल त्यांची भूमिका सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे मंडलिक गटाच्या भूमिकेवर बरेच कांही अवलंबून आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे सर्वाधिक आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही जास्त राहणार आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनाचीही ताकत काही भागात निर्णायक ठरू शकते. युती किंवा आघाड्या होताना या सर्वांचा विचार अपेक्षित आहे.
गतवेळचे राजकारण
गत निवडणुकीत शिवसेना म्हणून मंडलिक व संजय घाटगे गट एकत्र लढले होते. तर, राष्ट्रवादी म्हणून मुश्रीफ गट व भाजप म्हणून राजे गट स्वतंत्र लढले होते. निकालानंतर मंत्री मुश्रीफ व संजय मंडलिक यांनी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती. यातून संजय घाटगे गट नाराज झाला होता.
नेत्यांचे वारसदार मैदानात ?
माजी सभापती अमरिष घाटगे व वीरेंद्र मंडलिक हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असतील. तर, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे. अजून आरक्षण जाहीर झालेले नाही. आरक्षणावरही बरेच कांही अवलंबून आहे. महिला वारसदार म्हणूनही काही नावे पुढे येऊ शकतात.
गत वेळचे बलाबल :
- जिल्हा परिषद - ५
- राष्ट्रवादी काँग्रेस - ३ (मुश्रीफ गट)
- शिवसेना - १ (मंडलिक गट)
- शिवसेना - १ (संजयबाबा गट)
पंचायत समिती : १०
- राष्ट्रवादी काँग्रेस - ५ (मुश्रीफ गट)
- शिवसेना - ४ (मंडलिक गट)
- शिवसेना - १ (संजय घाटगे)