Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:50 IST2025-12-24T15:50:24+5:302025-12-24T15:50:58+5:30
चार जागांवर अडले

Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपांमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी उद्धवसेनेने दोन अंकी जागांची मागणी केली असून, यातील चार जागांवर एकमत होत नसल्याने उद्धवसेनेने कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा थेट मातोश्रीवर नेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.
उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहरप्रमुख सुनील मोदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीत उद्धवसेनेने दोन अंकी जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. यातील काही जागांवर एकमत झाले असले तरी चार जागांवर उद्धवसेना अडून बसली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १, प्रभाग क्रमांक ५ सह विक्रमनगर व प्रतिभानगर या परिसरातील जागांचा समावेश आहे. या जागांवर उद्धवसेनेने त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मागितली आहे.
मात्र, काँग्रेस या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला आकाराला येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसने सन्मानजनक जागा नाही दिल्या तर हा विषय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.