Kolhapur Crime: आरोपीला पकडताना झटापट, तीन पोलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:49 IST2025-09-01T12:49:00+5:302025-09-01T12:49:34+5:30
जखमी अवस्थेतच पोलिसांनी संशयिताला अटक केली

Kolhapur Crime: आरोपीला पकडताना झटापट, तीन पोलिस जखमी
इचलकरंजी : संशयित आरोपीला पकडत असताना झालेल्या झटापटीत शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना दानोळी (ता. शिरोळ) येथे घडली. त्यांच्यावर इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी विजय ऊर्फ बंडा सर्जेराव शिंदे (वय ४२) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बाळकृष्ण सूर्यवंशी, सद्दाम सनदी व सुकुमार बरगाले अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंदूर (ता. हातकणंगले) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याने गावातील एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे. त्याला मुलीच्या कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर मयूर पुजारी (रा. चंदूर), ओंकार पुजारी (रा. तिळवणी), शुभम बोरसे (रा. उदगाव), राहुल कांबळे (रा. इचलकरंजी) आणि बंडा शिंदे (रा. दानोळी) यांनी दुचाकीवरून कबनूरला निघालेल्या वैभव याच्यावर तलवारीने वार करून जखमी केले होते.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करून मयूर, ओंकार व राहुल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित संशयितांचा पोलिस शोध घेत होते. बंडा हा दानोळीत असल्याची माहिती शनिवारी (दि. ३०) पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी पोलिस दानोळीत पोहोचले. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिस त्याच्या पाठीमागे धावू लागल्यानंतर त्याने मोटारसायकल थांबवून पोलिसांच्या अंगावर ढकलली. त्यावेळी झालेल्या झटापटीत तीन पोलिस जखमी झाले. त्यातूनही पोलिसांनी पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बंडाला अटक केली.