Kolhapur Crime: विशाळगडावर पार्टी करण्याचे ठरविले; दारू पाजून मित्राचा खून केला अन् मृतदेह दरीत फेकला, तिघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:09 IST2025-03-21T12:08:53+5:302025-03-21T12:09:36+5:30
कोल्हापूर : घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मानोली (ता. शाहूवाडी) येथे मित्राचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा ...

Kolhapur Crime: विशाळगडावर पार्टी करण्याचे ठरविले; दारू पाजून मित्राचा खून केला अन् मृतदेह दरीत फेकला, तिघांना जन्मठेप
कोल्हापूर : घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मानोली (ता. शाहूवाडी) येथे मित्राचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी गुरुवारी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अमीर ऊर्फ कांचा अब्बास मुल्ला (वय २७), सुनील बाळू खोत (४८), सिद्धराम ऊर्फ सिद्धार्थ शांताप्पा म्हेतर (३०) आणि संजय शरद शेडगे (वय ३३, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. यांपैकी शेडगे हा मयत आहे.
या प्रकरणी पोलिस पाटील दत्तात्रय गोमाडे (वय ५९ रा. मानोली, ता. शाहूवाडी) यांनी फिर्याद दिली होती. आरोपींनी त्याचा मित्र संतोष मोहन तडाके (वय ३० रा. गुरू कनाननगर, इचलकरंजी) याचा २१ सप्टेंबर २०१९ ला मानोली येथे कोकण दर्शन पाॅइंटवर खून केला होता.
आरोपी संजय शेडगे आणि मयत संतोष दोघेही मावस भाऊ होते. संतोष हा घरातील लोकांना, नातेवाइकांना त्रास देत होता.
या कारणावरून शेडगे याने तिघा मित्रांना इचलकरंजी येथे बोलावून विशाळगड येथे पार्टी करण्याचे ठरविले. साक्षीदार राकेश जाधव याला फोन करून चारचाकी वाहनातून मानोली येथे गेले. तेथे संतोष याला दारू पाजून संशयितांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून चाकूने गळा कापला. त्याचा मृतदेह कोकण दर्शन पाॅइंटवरून दरीत फेकला.
वारूळ (ता. शाहूवाडी) येथे कडवी नदीच्या पात्रात रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले. या प्रकरणातील गाइड दिनेशा कांबळे याने व्हिडीओ करून मित्राला पाठविला. पोलिस पाटील गोमाडे यांनी हा व्हिडिओ पाहून शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली.
शाहूवाडीचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख तपास अधिकारी होते. सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी १७ साक्षीदार तपासले. चौकशीचे काम सुरू असताना आरोपी संजय शेडगे हा मयत झाला. आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू, पंचनामा, गुन्ह्याची कबुली आदी युक्तिवाद केला.
अमीर पन्हाळाकर, रंगराव भोसले, संजय कांबळे, आरती पडळकर, नोडल ऑफिसर तुषार नलवडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. कोर्ट पैरवी अधिकारी महिला काॅन्स्टेबल सीमा अष्टेकर यांचे सहकार्य लाभले.