Kolhapur Election 2026: काँग्रेसमध्ये एकच बंडखोर, तरी जिवाला घोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:02 IST2026-01-06T19:00:42+5:302026-01-06T19:02:07+5:30
काँग्रेसने सर्वांत आधी उमेदवार जाहीर करीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांची समजूत काढण्याची मोहीम सुरू केली होती

Kolhapur Election 2026: काँग्रेसमध्ये एकच बंडखोर, तरी जिवाला घोर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक ७५ जागांवर लढत असल्याने त्यांच्याकडे बंडखोरीचे प्रमाण तुलनेने अगदी नगण्य असले तरी ज्या कार्यकर्त्यांना थांबवले अशांची समजूत काढून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हान नेत्यांना पेलावे लागणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेस ७५ तर उद्धवसेना ६ जागांवर मैदानात आहे. काँग्रेसने सुरुवातीलाच उमेदवारांची यादी जाहीर करून बंडखोरांना थोपविण्यासाठी प्रयत्न केले. सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना संधीही मिळाली आहे.
वाचा : भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. जाणून घ्या
प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वसाधारण गटातून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय विक्रम जरग यांनी जनसुराज्यकडून उमेदवारी मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्याची ही एकमात्र बंडखोरी सोडली तर इतर ठिकाणी दखल घ्यावी अशी एकही बंडखोरी नसल्याचे चित्र आहे.
नाराजांच्या नाकदुऱ्या काढण्यासाठी धावपळ
काँग्रेसने सर्वांत आधी उमेदवार जाहीर करीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांची समजूत काढण्याची मोहीम सुरू केली होती. अनेकांना विविध समित्या, पदांवर घेण्याचे आश्वासन दिले गेल्याने बंडखोरीला आळा बसला. मात्र, काही प्रभागांमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे इच्छुक प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. अशा कार्यकर्त्यांच्या नाकदुऱ्या काढत त्यांना प्रचारात सक्रिय करण्यासाठी नेत्यांनी धावपळ सुरू केली आहे.