Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत ५ प्रभागांत हाय व्होल्टेज लढती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:15 IST2026-01-05T13:13:08+5:302026-01-05T13:15:45+5:30
कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत ५ प्रभागांत हाय व्होल्टेज लढती
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत पाच प्रभागांत हाय व्होल्टेज, तर चार ठिकाणी लक्षवेधी कुस्ती होणार आहे. या प्रभागांची चर्चा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातही रंगली आहे. त्याचबरोबर काही प्रभागांतील व्यक्तींच्या लढतीही चर्चेतील आहेत. त्यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील सर्व ६५ जागांपैकी बहुतांश जागांवर तुल्यबळ लढती होणार आहेत. त्यामधील चार ठिकाणी अटीतटीची लढत होणार आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २ (ड) राष्टवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास अशोक जांभळे विरुद्ध राष्ट्रवादीतून फुटून जाऊन शिव-शाहू आघाडीमधून उभारलेले परवेज लतीफ गैबान. प्रभाग ७ (ड) मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार)चे इचलकरंजी प्रमुख मदन कारंडे विरुद्ध माजी सभापती संजय केंगार. प्रभाग क्रमांक ९ (ब) माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई विरुद्ध काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे यांची मुलगी संतोषी कांबळे.
वाचा : उच्चशिक्षितांनाही लागले राजकारणाचे वेध; डॉक्टर ते वकील... आजमावत आहेत नशीब
प्रभाग १२ (ड) भाजपचे माजी शहर अध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या विरुद्ध माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे. प्रभाग १५ (ब) माजी बांधकाम सभापती नागेश पाटील यांची पत्नी ज्योती पाटील विरुद्ध माजी नगराध्यक्षा मेघा चाळके आणि ताराराणी आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांची मुलगी हिमानी चाळके यांच्यात अटीतटीची हाय व्होल्टेज कुस्ती होणार असल्याने त्यांच्याकडे शहरासह परिसराचे लक्ष लागले आहे.
वाचा : सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका
शहरातील विविध प्रभागांमधील तब्बल १८ ठिकाणी दुरंगी एकास एक लढत लागली आहे. त्यामध्ये प्रभाग १३ (क) मध्ये चंद्रकांत शेळके विरुद्ध नागेश शेजाळे. प्रभाग १४ (क) मध्ये अभिषेक वाळवेकर विरुद्ध नितीन भुते. प्रभाग १६ (ब) मध्ये सुशांत बाळासो कलागते विरुद्ध स्वाती अनुप सिदनाळे, (ड) मध्ये अरुणा प्रमोद बचाटे विरुद्ध संतोष महावीर जैन या लढती लक्षवेधी आहेत.
१२ मध्ये पॅनल टू पॅनल दुरंगी लढत
प्रभाग १२ मध्ये चारही जागांवर थेट एकास एक दुरंगी लढत लागली आहे. त्यामध्ये (अ) मध्ये नितेश पोवार विरुद्ध संजय कांबळे, (ब) मध्ये सुरेखा अजित जाधव विरुद्ध रूपाली शीतल दत्तवाडे, (क) मध्ये स्नेहल दीपक रावळ विरुद्ध राधा अमितकुमार बियाणी, (ड) मध्ये अनिल डाळ्या विरुद्ध प्रकाश मोरबाळे यांच्यात अटीतटीची लक्षवेधी लढत आहे.
प्रभाग ५ मध्ये ८ उमेदवार
प्रभाग क्रमांक ५ (ड) भाजप, शिव-शाहू आणि उद्धवसेना या ३ पक्षांच्या उमेदवारांसह तब्बल ५ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक सुनील पाटील, जुलेखा पटेकरी, मीना बेडगे, सतीश मुळीक, सतीश लाटणे यांच्या लढतीकडे लक्ष आहे.
प्रभाग ७ मध्ये ५ पक्ष ३ अपक्ष उमेदवार
प्रभाग ७ (ड) मध्ये भाजप, शिव-शाहू, उद्धवसेना, आम आदमी पार्टी, बसप या ५ पक्षांसह ३ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग १५ (क) लक्षवेधी निकाल
प्रभाग क्रमांक १५ क मनीषा प्रकाश पाटील (शिंदेसेना), तेजश्री अमृत भोसले (भाजप), मंजुळा प्रतापगोंडा पाटील (शिव-शाहू), शोभा संजय पाटील (उद्धवसेना) या चारही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभारले आहेत. यामध्ये त्या प्रभागातील मतदार कोणत्या पक्षाला कौल देणार, हा लक्षवेधी निकाल ठरणार आहे.
प्रभाग १५ (ड) पक्षांसह अपक्ष रिंगणात
प्रभाग क्रमांक १५ (ड) मध्येही भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, शिव-शाहू आघाडी या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार असून, त्यामध्ये ३ अपक्षही आपले नशीब अजमावत आहेत. सुरुवातीपासूनच प्रभाग १५ महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाने चर्चेत आला आहे.