Kolhapur Municipal Election 2026: मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:51 IST2026-01-12T16:50:36+5:302026-01-12T16:51:51+5:30
‘सुराज्य संकल्प’ नावाने डिजिटल जाहीरनामा प्रकाशित

Kolhapur Municipal Election 2026: मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल
कोल्हापूर : शहरातील लक्षतीर्थसह अनेक भागात अजूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे हद्दवाढ करून नेमका फायदा काय होणार आहे? असा सवाल जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते डॉ. विनय कोरे यांनी रविवारी विचारला. हद्दवाढीचा विषय राजकीय न करता वास्तवजन्य अभ्यास करून सोडवला पाहिजे. हद्दवाढीत येणारी गावे स्वत:हून सहभागी होतील, असा शहरातील विकास केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महापालिका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती, आरपीआय आठवले गट, पीआरपी कवाडे गटाचा जाहीरनामा सुराज्य संकल्प नावाने डिजिटल स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. यावेळी आमदार अशोकराव माने, समीत कदम, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, शहरात आजही अनेक प्रश्न आहेत. सेवा, सुविधा चांगल्या मिळत नाहीत, अशावेळी हद्दवाढीचा व्यावहारिक विचार झाला पाहिजे. शहरात गावे आल्यानंतर किती उत्पन्न वाढणार आहे. या उत्पन्नातून त्या गावांचा विकास करणे शक्य आहे का? हद्दवाढ झाल्यानंतर कररूपाने किती उत्पन्न मिळेल? याचा अभ्यास करून हद्दवाढीचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची तुलना पुण्याशी होऊ शकत नाही. पुणे अनैसर्गिक वाढले आहे. यामुळे तेथे वेळोवेळी हद्दवाढ करण्याची आवश्यकता भासली; पण अजूनही पुण्यात मुंबईप्रमाणे वाहतूक व्यवस्था आणि इतर सेवा, सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. शहरात सिमेंटचे रस्ते झाले त्यानंतर टोल बाहेरच्या चारचाकी वाहनांना लागणार होता. या प्रकल्पाला विरोध केला. परिणामी आता सिमेंट रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जमीन यादीच्याही पुढची तयारी केली होती; पण...
डॉ. कोरे म्हणाले, सतेज पाटील यांनी आम्ही शासकीय जमीन लाटल्याचा आरोप केल्यानंतर मी त्यांनी किती जमिनी लाटल्या याची यादीच नव्हे, तर त्याही पुढची तयारी केली होती. ती तयारी ते तरी निवडणूक रिंगणातून माघार घेतील नाही तर मी तरी घेईन, अशी होती. त्यांना मी बिंदू चौकात समोरासमोर येण्याचे आव्हान देणार होतो; पण त्यांनी दुसऱ्या दिवशी तो विषय थांबवला. राजकीय संस्कृतीचा विचार करून मीही शांत राहिलो; मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना मी विधानपरिषदेला मदत केलेल्याच व्हिडीओही व्हायरल केले होते. तरीही त्यांनी माझ्यावर का आरोप केले, याचे उत्तर तेच देऊ शकतील.
सुराज्य संकल्प जाहीरनाम्यातील प्रमुख कामे
- शहराबाहेरून रिंगरोड, बसेस लेन, सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग
- स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वाहतुकीला शिस्त
- शहराचा नियोजनबद्ध विकास
- आरोग्य सुविधा, पंचगंगा नदी पूरनियंत्रण, नदी प्रदूषण कमी करणे.
- महापालिका शाळांचे डिजिटलायझेशन, झोपडपट्टी पुनर्विकास