Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत मुरब्बी उमेदवारांसोबत नवख्यांची टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:21 IST2026-01-09T14:20:24+5:302026-01-09T14:21:10+5:30
माजी नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक एका पारड्यात, विरुद्ध माजी नगरसेविकेसह अन्य उमेदवारांची लढत

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत मुरब्बी उमेदवारांसोबत नवख्यांची टक्कर
अतुल आंबी
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ मध्ये एक माजी नगराध्यक्ष, एका उपनगराध्यक्षाची पत्नी, पाच माजी सभापती आणि आठ माजी नगरसेवक असे मातब्बर महायुतीकडून निवडणूक रिंगणात उभे आहेत. विरोधात एक माजी नगरसेविका आणि एका माजी नगराध्यक्षाचा पुत्र अपक्ष उभा आहे. अन्य नवख्या उमेदवारांना घेऊन शिव-शाहू आघाडी टक्कर देत आहे.
महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडी अशी थेट लढत या तीनही प्रभागांत चुरशीने सुरू असली तरी त्यामध्ये काही जागांवर उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, आप आणि अपक्ष यांच्याकडूनही तगडा प्रचार सुरू आहे.
प्रभाग क्रमांक ४ अ मध्ये शिंदेसेनेकडून माजी सभापती दिलीप झोळ, तर शिव-शाहू आघाडीकडून उद्धव सेनेचे शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण यांच्यात काटे की टक्कर सुरू आहे. शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना अशा या दोघांच्या लढतीत जनता कोणत्या पक्षाला कौल देते, हे स्पष्ट होणार आहे. ब मध्ये मोनाली मांजरे विरुद्ध दीपाली अथणे यांची लढत आहे. दोन्ही गटांत दोन-दोन अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत. कमध्ये मनीषा कुपटे आणि सुलोचना पाटील यांची एकास एक लढत असून, डमध्ये माजी सभापती मनोज हिंगमिरे विरुद्ध सागर कुंभार यांच्यात चुरस सुरू आहे.
प्रभाग ५ अ मध्ये माजी नगरसेविका शकुंतला मुळीक यांचे पुत्र सतीश मुळीक विरुद्ध सतीश लाटणे यांच्यात लढत असून, १ अपक्ष उमेदवारही उभा आहे. ब मध्ये वैशाली पोवार आणि माजी नगरसेविका मीना बेडगे एकास एक, क मध्ये माजी सभापती जुलेखा पटेकरी विरुद्ध अनुराधा भोसले, तर डमध्ये माजी नगरसेवक सुनील पाटील (भाजप) विरुद्ध शिवाजी पाटील (उद्धवसेना) आणि अमोल सूर्यवंशी (शिव-शाहू) या तिघांसह पाच अपक्ष रिंगणात आहेत.
प्रभाग ६ अ मध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अलका स्वामी (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे अनिल झाडबुके, शिव-शाहूचे बापू गेजगे, वंचित बहुजनचे हेमंत शिंदे आणि एक अपक्ष लढत आहेत. ब मध्ये माजी नगरसेविका किरण खवरे विरुद्ध प्रियांका बेलेकर, एक अपक्ष उभे आहेत. कमध्ये माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांची पत्नी विजया महाजन विरुद्ध सुजाता पोवार यांची एकास एक लढत असून, डमध्ये माजी सभापती विठ्ठल चोपडे विरूद्ध शिव-शाहूचे अभय बाबेल, उद्धवसेना साहील कलावंत, आपचे यशवंत भंडारे आणि एक अपक्ष रिंगणात आहेत. तीनही प्रभागांतील अपक्षांच्या मतांची बेरीज-वजाबाकी अनेक उमेदवारांना धक्कादायक निकाल देऊ शकते.
प्रभाग ५ डमध्ये ५ अपक्ष
प्रभाग ५ डमध्ये भाजप, उद्धवसेना, शिव-शाहू आघाडी यांच्यासह तब्बल ५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या मतांचे ध्रुवीकरण विजयाचा गुलाल बदलणार का? याकडे लक्ष लागले आहे.
पती-पत्नी आणि मुलगा
प्रभाग क्रमांक ५ अ, क आणि ड या तीन ठिकाणी सचिन भरते, त्यांची पत्नी प्रतीक्षा भरते आणि मुलगा सुमित भरते असे घरातील तिघेजण निवडणुकीला उभारले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे.