Kolhapur: चंदगड बंधाऱ्यावर पाणी, गोव्याकडे जाणारा मार्ग तिसऱ्यांदा बंद; १० बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:19 IST2025-07-28T13:18:46+5:302025-07-28T13:19:14+5:30
हा पाऊस भात रोप लागणीसाठी उपयुक्त असून, ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला

Kolhapur: चंदगड बंधाऱ्यावर पाणी, गोव्याकडे जाणारा मार्ग तिसऱ्यांदा बंद; १० बंधारे पाण्याखाली
चंदगड : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, ताम्रपर्णी नदीवरील ४ तर घटप्रभा नदीवरील ६ असे एकूण १० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड बंधाऱ्यावर पाणी आल्याने तिसऱ्यांदा गोव्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला असून, ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, चंदगड, हल्लारवाडी, कुर्तनवाडी हे तर घटप्रभा नदीवरील पिळणी, हिंडगाव, कानडी-सावर्डे, कानडेवाडी, बिजूर-भोगोली, तारेवाडी असे एकूण १० बंधारे यंदा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. हा पाऊस भात रोप लागणीसाठी उपयुक्त असून, ९० टक्के काम पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
घटप्रभा, जंगमहट्टी व जांबरे हे मध्यम प्रकल्प जुलैच्या सुरुवातीलाच भरले आहेत. इतर १८ लघू पाटबंधारे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस अगोदरच पाणीसाठा पूर्ण झाला आहे. सध्या घटप्रभा धरणातून ६०५४ क्युसेक, विद्युतगृहातून ८०० क्युसेक, जंगमहट्टीतून ९९ क्युसेक तर जांबरेतून १०१९ क्युसेक व विद्युतगृह विसर्ग २४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चंदगड बंधाऱ्याची उंची वाढविण्याची गरज
चंदगडहून गोव्याला जाणाऱ्या मार्गावर चंदगड बंधाऱ्यावर तिसऱ्यांदा पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोव्याला जाण्यासाठी हा जवळचा महत्त्वाचा मार्ग असल्याने या बंधाऱ्याची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.