Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:43 IST2026-01-13T18:42:12+5:302026-01-13T18:43:07+5:30
कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी, पोलिस प्रशासन अलर्ट

संग्रहित छाया
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे तगडे नियोजन केले आहे. दोन्ही शहरांत दीड हजार पोलिस, १२१० होमगार्ड यासह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. उपद्रवी केंद्रांची निश्चिती केली असून, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच मतदान शांततेत होण्यासाठी सराईतांवर नजर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
निवडणुकीसाठी पोलिस खात्याची तयारी
महापालिका निवडणुकांसाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून तयारीला सुरुवात केली होती. दोन आणि त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना नोटिसा देणे, गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना हद्दपार करणे, गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, उपद्रवी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यासह मतदान आणि मतमोजणीसाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
१०० अधिकारी, १४०० पोलिस कर्मचारी
कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही शहरातील बंदोबस्तासाठी सुमारे १०० पोलिस अधिकारी आणि १४०० अंमलदार तैनात केले जाणार आहेत. याशिवाय १२१० होमगार्ड, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन सशस्त्र तुकड्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत.
कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी
शहरात ४४ ठिकाणी १८४ मतदान केंद्रे उपद्रवी आहेत. यात सदर बाजार, विक्रमनगर, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत यासह पेठांमधील काही भागाचा समावेश आहे. चुरशीच्या लढतींमुळे संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले आहे. या केंद्रांवर पोलिस आणि होमगार्डसह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.
२०६ सराईतांना पाठविले जिल्ह्याबाहेर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील २०६ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले. यात कोल्हापुरातील १२८, तर इचलकरंजीतील ७८ सराईतांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे अडीचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.
सहा हजार शस्त्रे पोलिसांत जमा
जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार शस्त्रे आहेत. सुरक्षा रक्षक आणि खेळाडूंचा अपवाद वगळता साडेसहा हजार शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्ये जमा झाली आहेत. जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत ही शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्येच राहणार आहेत.
शहरातील प्रतिबंधात्मक कारवाया
- शाहूपुरी : ५१
- राजारामपुरी : ३७
- लक्ष्मीपुरी : ३०
- जुन राजवाडा : ३०
असा आहे बंदोबस्त
कोल्हापूर
- अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
- पोलिस उपअधीक्षक : ०६
- पोलिस निरीक्षक : ११
- सहायक/उपनिरीक्षक : ४२
- श्रेणी उपनिरीक्षक : १८
- पुरुष अंमलदार : ६२४
- महिला अंमलदार : ९३
- होमगार्ड : ७९०
- एसआरपीएफ : दोन तुकड्या
- सीआरपीएफ : दोन तुकड्या
इचलकरंजी
- अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
- पोलिस उपअधीक्षक : ०३
- पोलिस निरीक्षक : ०७
- सहायक/उपनिरीक्षक : २२
- श्रेणी उपनिरीक्षक : ०८
- पुरुष अंमलदार : २६८
- महिला अंमलदार : ३०
- होमगार्ड : ४२०
- एसआरपीएफ : एक तुकडी
- सीआरपीएफ : एक तुकडी