Satara-Kagal highway six lane construction: मुदत संपण्यास आठ महिने, काम कसेबसे ४५ टक्के..!
By भीमगोंड देसाई | Updated: August 14, 2025 13:28 IST2025-08-14T13:26:48+5:302025-08-14T13:28:06+5:30
विलंबाने वाहनधारक वैतागले, दुसऱ्या टप्याचे काम ७० टक्के पूर्ण

संग्रहित छाया
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गातील सातारा ते कागलपर्यंत १२८ किलोमीटर रस्त्यांचे सहापदरीकरण कामाचा वेग मंदावला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कागल ते पेठनाक्यापर्यंतचे काम केवळ ४५ टक्केच, तर तेथून पुढे साताऱ्यापर्यंतचे काम ७० टक्के झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग, जोडपुलाची संख्या वाढवणे, जागा बदलणे अशा स्थानिक अडथळ्यामुळे कामास विलंब होत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
सातारा ते कागल महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर केले जात आहे. ठेकेदारांनी कामावर खर्च करून ते टोलरूपाने वसूल करणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा नुकताच दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती घेतल्यानंतर हे चित्र समोर आले आहे.
पेठनाका ते कागलपर्यंतच्या ६१ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरुवात झाली. यासाठी २१११ कोटींचा खर्च येणार आहे. जुलै २०२५ पर्यंत प्रत्यक्षात ४५ टक्केच काम झाले आहे. ४० टक्के रक्कम ठेकेदार कंपनीस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम ३० एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे.
दुसऱ्या टप्प्यात पेठनाका ते साताऱ्यापर्यंत ६७ किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी २३३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाला मे २०२२ मध्ये सुरुवात झाली. ३१ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. जुलैअखेरपर्यंत प्रत्यक्षातील काम ७०.२४ टक्के झाले आहे. कामाची आर्थिक प्रगती ७५.९६ टक्के झाली आहे.
दृष्टीक्षेपातील काम
- कागल - सातारा एकूण किलोमीटर : १२८ किलोमीटर
- कामाचे दोन टप्पे : पेठनाका ते कागल पहिला टप्पा, पेठनाका ते सातारा दुसरा टप्पा
- पहिल्या टप्प्यातील नियोजित मोठे पूल संख्या : ६
- पुलांना जोड : २७
- सेवा रस्त्यावर मोठे पूल : २५
- उड्डाण पूल : नवीन ५, जुने दुरुस्त करणे ५
- प्रमुख जंक्शन : ८
- छोटे खानी पूल : १३६
- दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख पूल : ५
- सेवा रस्त्यावरील मोठे पूल : २४
- उड्डाणपूल : २ नवीन, २ दुरुस्ती
- छोटेखानी पूल : १८९
- प्रमुख जंक्शन : ३६
कामाला गतीने नसल्याने वाहनधारक हैराण
कागल - साताऱ्यापर्यंतच्या कामाला गती नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. वेळेचा अपव्यय होत आहे. टोल देवूनही वाहनधारकांचे इंधनावरही खर्च अधिक होत आहे.