Ichalkaranji Municipal Election 2026: 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:54 IST2026-01-03T13:53:05+5:302026-01-03T13:54:18+5:30
आमदारांना अशी भाषा शोभत नाही

संग्रहित छाया
इचलकरंजी : महायुतीकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी रोख ४० लाख रुपये, फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र, त्याला आमचा एकही उमेदवार बळी पडला नाही. त्याचबरोबर एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी आमदारानेही एका उमेदवाराला माघारीसाठी फोन केला, हे त्यांना शोभत नाही, असा आरोप शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
बावचकर म्हणाले, सत्ता असेल तरच पाणी मिळणार आहे, अशी वल्गना आमदार राहुल आवाडे करीत आहेत. एकप्रकारे ते लोकांच्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केएटीपी व तारदाळजवळ पाणी येते, तर इचलकरंजीला का येऊ शकत नाही? सुरेश हाळवणकर यांनीही सोयीस्कर भूमिका घेतली आहे. वारणा योजनेला कोण विरोध केला, हे हाळवणकर चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या उमेदवारांना विविध प्रकारची आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांना यश आले नाही. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने सुरू आहे.
वाचा : अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला
सागर चाळके म्हणाले, मुख्यमंत्री चौथ्यांदा इचलकरंजीला येत आहेत. अनेकवेळा त्यांनी इचलकरंजीला पाणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पाळले नाही. आता पुन्हा एकदा खोटे आश्वासन देण्यासाठी ते येत आहेत. त्याला जनता बळी पडणार नाही.
मदन कारंडे म्हणाले, सतेज पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत इचलकरंजीला पाणी का दिले नाही, हे सांगावे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख कोणाच्या संगतीत असतात?, कोणाचे काम करतात, हे तपासावे. पत्रकार परिषदेस भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, रवी गोंदकर, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.
आमदारांना अशी भाषा शोभत नाही
आमदार सतेज पाटील यांनी शहराला पाणी देण्याचे छोटे वक्तव्य केले. त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांच्या बुडाला आग लागली. ते आता त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका करीत आहेत. ज्येष्ठ नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे शोभत नाही. टीका करण्यापेक्षा शहराला पाणी द्यावे, असे बावचकर म्हणाले.