विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:01 IST2026-01-10T17:59:42+5:302026-01-10T18:01:32+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे नियोजन आमच्याकडे तयार

विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
इचलकरंजी : शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक सर्व कल्पना आणि नियोजन आराखडा आमच्याकडे आहे. विरोधकांकडे विकासाचे काहीही नियोजन नाही, निधी नाही. ते फक्त विरोधाला विरोध करीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केला. इचलकरंजी भाजप कार्यालयात महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजीला केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पाणी, रस्ते, विद्यार्थी, शिक्षण, उद्यान, उद्योग अशा सर्व बाबींवर आमचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे नियोजन आमच्याकडे तयार आहे.
वाचा: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान
महायुतीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पाणीपुरवठ्याचे सुसूत्रीकरण करून नियमितता आणणार, व्यापाराला प्रोत्साहन, ई-बस सुविधा, खेळाला प्रोत्साहन, पूरस्थितीवर उपाययोजना, रस्ते सुधारणा, आरोग्य सेवा, सौरदिवे, आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर अखेरच्या पानावर शिवतीर्थचा दुसरा टप्पा, धार्मिक स्थळे, मंदिरे, आध्यात्मिक केंद्रांचे नूतनीकरण, सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसविणार, क-१ शेरा काढणे व शास्ती माफ करणे, प्रशासकीय कार्यालये ‘व्हाय-फाय’ने जोडणे असे मुद्दे मांडले आहेत. यावेळी आमदार राहुल आवाडे व संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत मोहिते यांनी आभार मानले.
१०० फुटी ध्वज उभारणार
शहापूर चौकाचा विस्तार करून तेथे १०० फुटी भगवा ध्वज उभारणार. तसेच महात्मा गांधी पुतळा येथे १०० फुटी तिरंगा ध्वज उभारणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती
कृष्णा आणि पंचगंगा या दोन्हीही जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात अतिरिक्त ४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी दिले जाणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.