Kolhapur- शिक्षणाचा परीघ: नोकरीच्या खात्रीने व्यावसायिककडे विद्यार्थ्यांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:47 IST2025-01-30T18:46:50+5:302025-01-30T18:47:19+5:30

अरुण काशीद इचलकरंजी : शहराला १२५ वर्षांची शैक्षणिक परंपरा आहे. औद्योगिक शहर व व्यवसायाच्या सद्य:स्थितीची माहिती असल्याने नोकरीची खात्री ...

Students are turning to new vocational education that has job assurance | Kolhapur- शिक्षणाचा परीघ: नोकरीच्या खात्रीने व्यावसायिककडे विद्यार्थ्यांचा कल

संग्रहित छाया

अरुण काशीद

इचलकरंजी : शहराला १२५ वर्षांची शैक्षणिक परंपरा आहे. औद्योगिक शहर व व्यवसायाच्या सद्य:स्थितीची माहिती असल्याने नोकरीची खात्री असणाऱ्या नवनवीन व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थी वळत आहेत. अकॅडमीच्या निमित्ताने शहर शैक्षणिक हब बनू पाहत आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांची अवस्था गेली अनेक वर्षे ‘जैसे थे’ आहे. इंग्रजी माध्यमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यामध्ये राजाराम महाविद्यालयानंतर दुसऱ्या क्रमांकाची शाळा गोविंदराव हायस्कूलच्या रूपाने शहरात सुरू झाली. त्यानंतर मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, आदी शाळा सुरू झाल्या. शहरातील पहिले महाविद्यालय दत्ताजीराव कदम एएससीच्या रूपाने स्थापन झाले. कालांतराने महाविद्यालयांची संख्याही वाढली. पारंपरिक शिक्षणाकडे वळणारे विद्यार्थी नोकरीच्या खात्रीने आता व्यवसाय शिक्षणाकडे जाताना दिसत आहेत. एकूण प्राध्यापकांच्या संख्येच्या दहा टक्के जागा या सहा महिन्यांच्या वर रिक्त ठेवता येत नाहीत. असे असतानाही महाविद्यालयांतील सुमारे ६० ते ७० टक्के प्राध्यापकांची पदे गेल्या दहा वर्षांत रिक्त आहेत. त्याचा परिणाम अध्यापनावर होत आहे.

शासनाने वेतनेतर निधीही बंद केला आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्राध्यापकांना समजून घेण्यास किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. प्राथमिक शाळांची अवस्थाही अशीच आहे. महापालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवून खासगी शाळांकडे ओघ वाढलेला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस खासगी शाळांची संख्या वाढत आहे. जीई आणि नीट परीक्षांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे अकॅडमीची संख्या शहरात वाढली. विद्यार्थी आता या अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

शाळांची सद्य:स्थिती

महापालिका प्राथमिक शाळा
मराठी माध्यम - २५
उर्दू माध्यम - ८
हायस्कूल - १
विद्यार्थ्यांची संख्या
इयत्ता पहिली ते आठवी - ७३३२
इमारत संख्या - १६
शिक्षक - मंजूर पदे - २८३, कार्यरत - २७५, रिक्त - ८

प्राथमिक - माध्यमिक - एकूण
खासगी अनुदानित शाळा - ३३ - २७ - ६०
अंशत: अनुदानित - ४ - ३ - ७
विनाअनुदानित - ४ - १ - ५
स्वयं अर्थसहाय्यित - २९ - १२ - ४१
सामाजिक कल्याण - १ - १ - २
एकूण - १०४ - ४५ - १४९

माध्यमनिहाय शाळा
माध्यम - शाळांची संख्या

मराठी - १०१
उर्दू - १२
हिंदी - २
कन्नड - १
इंग्रजी - ३३
एकूण - १४९

विद्यार्थ्यांची संख्या

  • इयत्ता पहिली ते बारावी - मुले - ३०३२०, मुली - २८३००, एकूण - ५८६२०.
  • वरिष्ठ महाविद्यालये - ५
  • स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय - १
  • व्यवसाय शिक्षण पदविका - २
  • कायदा महाविद्यालय - १
  • शिक्षणशास्त्र महाविद्यालय - १
  • अध्यापक महाविद्यालय - १
  • चित्रकला महाविद्यालय - १
  • शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या - १५०००

विद्यार्थ्यांचा कल कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन व बीसीए या अभ्यासक्रमांकडे वाढला आहे. त्यामुळे कला, वाणिज्याकडील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचाही हा परिणाम आहे. यूजीसी व शासनाने अनुदान बंद केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण घेता येणार असून, त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. - डॉ. एस.एम. मणेर, प्राचार्य दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालय, इचलकरंजी.

Web Title: Students are turning to new vocational education that has job assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.