Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:19 IST2026-01-09T12:17:01+5:302026-01-09T12:19:09+5:30
बंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांसह १३०० होमगार्ड, संवेदनशील प्रभागांमध्ये करडी नजर

Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी महासैनिक दरबार हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्ट्राँगरूम तसेच रमणमळा येथील स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचाराला वेग आला असून मतदानास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत कंट्रोल युनिट स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी फुलारी यांनी संबंधित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्या. मतमोजणी काउंटरची मांडणी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या ये-जा करण्याची प्रवेश व्यवस्था, मतमोजणी केंद्रापासून कार्यकर्त्यांना थांबविण्याचे अंतर, पार्किंग व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत येणाऱ्या वाहनांच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, आदी अधिकारी उपस्थित होते.
बंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांसह १३०० होमगार्ड, संवेदनशील प्रभागांमध्ये करडी नजर
कोल्हापूर : महापालिकांसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानानंतर १६ जानेवारीला मतमोजणी होत आहे. कोल्हापुरात चार ठिकाणी, तर इचलकरंजीत एका ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची ठिकाणे वाढल्याने पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यासाठी एक हजार पोलिस, १३०० होमगार्ड, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
चुरशीच्या लढतींमुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांवर पोलिसांची नजर आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. मतांसाठी जेवणावळी, आमिषे, दबाव, पैसे देण्याचे प्रकार घडत असल्यास विभागीय निवडणूक कार्यालयांमध्ये तक्रारी देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
क्रिटिकल मतदान केंद्रे नाहीत
कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महानगरपालिकांमध्ये एकही क्रिटिकल मतदान केंद्र नाही. तरीही लक्षवेधी आणि चुरशीच्या लढती असलेल्या प्रभागांवर पोलिसांची विशेष नजर आहे. कसबा बावडा, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, क्रशर चौक, संभाजीनगर, रुईकर कॉलनी, सदर बाजार, लक्ष तीर्थ वसाहत परिसरातील काही मतदान केंद्रांवर विशेष नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी मतदानावेळी पोलिसांसह एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोल्हापुरात चार, इचलकरंजीत एका ठिकाणी मतमोजणी
कोल्हापुरात व्ही. टी. पाटील सभागृह, गांधी मैदान, रमणमळा आणि दुधाळी येथे मतमोजणी होईल. इचलकरंजीत राजीव गांधी भवन येथे मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर सशस्त्र बंदोबस्त तैनात केला जाईल असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
असा असेल बंदोबस्त
- पोलिस - १०००
- होमगार्ड - १३००
- एसआरपीएफ - १८० (दोन तुकड्या)
- सीआरपीएफ - १८० (दोन तुकड्या)
कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील मतदानासह मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले आहे. दोन्ही ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात असेल. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे. अन्यथा दोषींवर कठोर कारवाया केल्या जातील. - योगेश कुमार - पोलिस अधीक्षक