..म्हणून मी कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:45 IST2025-02-10T12:41:58+5:302025-02-10T12:45:33+5:30
शीशमहाल आणि कागलचा बोळ

..म्हणून मी कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय - मंत्री हसन मुश्रीफ
मुरगूड : सर्वसामान्यांना जे मिळाले नाही ते देण्यासाठीच समाजकारण, राजकारणाचा उपयोग केला म्हणूनच मी नऊ वेळा मंत्री म्हणून शपथ घेतली. मिळालेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचा वापर करून शासनाच्या सर्व योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी राबवून जिल्ह्याला मेडिकल हब मेडिकल टुरिझम करणार असल्याचा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मुरगूड (ता. कागल) येथे बांधकाम कामगार कार्यलयाचा शुभारंभ व अटल घरकूल योजनेअंतर्गत नागरिकांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आकस्मित मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांना आर्थिक मदत वितरीत केली. शिवाय २८ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे ५६ लाखांचा निधी घरकूल बांधण्यासाठी दिल्याचे प्रमाणपत्र वितरीत केले. बांधकाम कार्यलयाचे उद्घाटन मुश्रीफांच्या हस्ते झाले.
मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या तिजोरीला हात न लावता आपण बांधकाम कामगार महामंडळाची स्थापना केली. सध्या या मंडळाकडे चौदा हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून कामगारांना लाभ मिळतात. एका वर्षात कागल तालुक्यात ३० कोटी शिष्यवृत्ती मिळाल्याचे ही त्यांनी सांगितले. सहा कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर, बीडीओ कुलदीप बोन्गे यांनी घरकूल योजनेची माहिती दिली.
यावेळी वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील, डी.डी.चौगले, रंगराव पाटील, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, देवानंद पाटील, सुनील चौगले, राजू आमते, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, जयसिंग भोसले, सत्यजीत चौगले, रणजीत मगदूम, दिगंबर परीट, राजाराम गोधडे, दत्तात्रय मंडलिक, गब्बर भारमल, आकाश आमते आदी उपस्थित होते.
शीशमहाल आणि कागलचा बोळ
दिल्लीमध्ये आपची सत्ता गेली, याला एकमेव कारण म्हणजे केजरीवाल यांनी स्वतःसाठी बांधलेला शिशमहाल. लोकांना हे आवडले नाही, म्हणून केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला. यासाठी मी अजून ही कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगत नेत्यांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवावी लागते, अशी पुष्टीही त्यांनी दिली.
अडीच लाख मुलींना लस देणार..
कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख मुलींना गर्भाशय व ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचा मानस असून, यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थेचा आधार घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.