इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीला धक्का; आप, स्वाभिमानी पक्षानंतर उद्धवसेनाही पडली बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:03 IST2025-12-29T18:02:41+5:302025-12-29T18:03:39+5:30
मशाल या चिन्हावर निवडणूक लढविणार : जिल्हाध्यक्ष संजय चौगुले

इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीला धक्का; आप, स्वाभिमानी पक्षानंतर उद्धवसेनाही पडली बाहेर
इचलकरंजी : उद्धव सेनेला शिव-शाहू विकास आघाडीमध्ये समाधानकारक जागा न दिल्याने आघाडीतून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.
चौगुले म्हणाले, गेली १५ दिवस शिव-शाहू विकास आघाडीसोबत आमच्या चर्चा सुरू आहेत. आम्ही १५ जागा मागितल्या होत्या. ८ ते १० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तीन-चार जागा देण्याची भाषा करीत आहेत. एखाद्या पक्षाला एका गटासारखी वागणूक देण्याचा प्रयत्न केला, हे योग्य नाही. राज्य संघटन नवेझ मुल्ला यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबतही चर्चा केली होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांना निरोप देण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु तसे झाले नाही.
निष्ठावंतांना डावलून इतरांना जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा देणार, याविषयी सुरुवातीपासून आम्ही मागणी करीत होतो. मात्र, शेवटपर्यंत त्यावर निर्णय घेतला गेला नाही. प्रस्थापितांना संधी मिळू नये म्हणून आम्ही या आघाडीसोबत राहिलो होतो. परंतु आता त्यांच्यासोबत राहणार नाही.
पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही आघाडीतून बाहेर पडत आहोत आणि मशाल या चिन्हावर निवडणूक लढविणार आहोत. यावेळी मलकारी लवटे, सागर जाधव, आनंदराव शेट्टी, अभिजीत लोले, रतन वाझे, अजय घाडगे, लक्ष्मण पाटील, संतोष लवटे, आदी उपस्थित होते.