रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:09 IST2022-06-10T12:08:54+5:302022-06-10T12:09:29+5:30
जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.

रस्त्याचा अंदाज चुकला, कापशीजवळ ट्रक पोलीस चौकीत घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
म्हाकवे : मुरगूड-निपाणी या आंतरराज्य मार्गावर लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील पोलीस चौकीमध्ये ट्रक घुसल्याने पोलीस चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने ही पोलीस चौकी बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या सुरू असणाऱ्या या रस्त्याच्या - नियोजनशून्यतेमुळेच चालकाला अंदाजच न आल्याने त्याचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.
मुरगुडहून निपाणीकडे (एमएच४३-वाय-८०२०) हा ट्रक जात होता. या पोलीस चौकीच्या समोरच काँक्रीटचा रस्ता संपला आहे. त्यानंतर दगड मुरुमाचा भराव आहे, त्यामुळे येथे रस्ता चढ-सकल बनला आहे. सुदैवाने पूर्वेकडे जाणारा ट्रक दक्षिणेकडील चौकीकडे घुसला. जर हा ट्रक उत्तरेकडे वळला असता तर अनेक राहत्या घरात घुसून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी रास्तारोको मंत्र्यांना अडविणे यासह विविध आंदोलने करत आवाज उठवत आहेत. परंतु येथील पोलीस या आंदोलकांनाच थोपवत वेळ मारून नेत होते. या घटनेने तरी प्रशासनाचे डोळे उघडणार काय, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.