Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:49 IST2025-12-31T11:47:55+5:302025-12-31T11:49:28+5:30
नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात
इचलकरंजी : येथील भारतीय जनता पार्टीमधील तब्बल ७ जणांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले, तर ५ जण अन्य पक्षांतून निवडणुकीला उभे राहिले आहेत. अन्य काही नाराजांना रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी निवडणुकीत अंडर-करंट विरोधी हालचाली होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. दरम्यान, मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एकूण ४५६ अर्ज दाखल झाले आहेत.
भाजपच्या महिला शहराध्यक्ष अश्विनी कुबडगी, त्याचबरोबर पूनम जाधव, हेमंत वरुटे, मोहन बनसोडे, कपिल शेटके, अरुणा काजवे, मारुती पाथरवट या सात जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले, तर अभय बाबेल, संजय गेजगे, महावीर जैन, संतोष जैन, या चार जणांनी शिव-शाहू आघाडीतून आणि संध्या बनसोडे यांनी वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी घेतली आहे.
या बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवारांना भाजपमध्येच रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. परंतु, नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता आहे. नाराजीतून अशी चर्चा सुरू झाली असली तरी त्यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाच्या कामात लावण्याचा कसबही आता पक्षश्रेष्ठींनाच करावा लागणार आहे.