Kolhapur: हरिपाठाचे पठण-गायन, वऱ्हाडींना तीन हजार पुस्तिकेचे वाटप; सरवडेत पार पडला आगळावेगळा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:00 IST2025-06-24T17:58:51+5:302025-06-24T18:00:42+5:30

पै-पाहुणे, आप्तेष्ट रंगले सामूहिक हरिपाठ गायनात

Ram More from Sarwade, Kolhapur district, performed a communal recitation and singing of Haripatha on the occasion of his wedding | Kolhapur: हरिपाठाचे पठण-गायन, वऱ्हाडींना तीन हजार पुस्तिकेचे वाटप; सरवडेत पार पडला आगळावेगळा लग्नसोहळा

Kolhapur: हरिपाठाचे पठण-गायन, वऱ्हाडींना तीन हजार पुस्तिकेचे वाटप; सरवडेत पार पडला आगळावेगळा लग्नसोहळा

दत्ता लोकरे

सरवडे : लग्न म्हटले की साउंड सिस्टिम आणि त्यांचा कर्णकर्कश आवाज, साथीला तरुणाईबरोबर महिला वऱ्हाडी मंडळीचा डान्स ठरलेला. रात्री वरातीचा ताल तर तरंगीलच, पण सरवडे (ता. राधानगरी) येथील राम मोरे यांनी आपल्या विवाहप्रसंगी या सर्वांना फाटा देत हरिपाठाचे सामुदायिक पठण-गायन आणि वऱ्हाडी मंडळींना अक्षतांसोबत तीन हजार हरिपाठ पुस्तिकेचे वाटप केले. या आदर्श उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे.

सरवडे येथील ह.भ.प. वसंत भाऊ मोरे हे पती-पत्नी विठ्ठलाचे परमभक्त. त्यांचे घर तर साक्षात मंदिरच. घरी प्रत्येकजण एकमेकांना माउली म्हणूनच बोलवीत असतो. सर्वांच्या आचार-विचारात वारकरी धर्माचे काटेकोर पालन हीच या कुटुंबाची ठळक ओळख. वसंत मोरे यांचा मुलगा राम याचा कासारपुतळे येथील राजेंद्र शिवाजी पाटील यांची कन्या स्वाती हिच्याशी नुकताच झाला.

वर-वधूकडील दोन्ही कुटुंबे वारकरी संप्रदाय अंगीकारलेली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचा विवाह सोहळा वारकरी संप्रदायाला पाईक राहत करण्याचा निर्णय घेतला आणि भागातील वारकरी संप्रदायाबरोबरच पै- पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

संत ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक केंद्र तुरंबे येथील शेकडो तरुण वारकरी व बाल वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ, हरिजागर करत लग्नमंडपात रंगत आणली. अक्षता वाटत असतानाच उपस्थितांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले. तसेच लग्नमंडपात साउंड सिस्टीमला व गायन करणारा वाद्यवृंदसुध्दा विठ्ठल नामाचा गजर करत होते.

त्यामुळे अलीकडे डॉल्बीच्या ठेक्यावर धांगडधिंगा घालणारी तरुणाई नवरा-नवरीला हार-तुरे घालताना उचलून होणारा किळसवाणा प्रकार याला या विवाहसोहळ्यात फाटा दिला गेला होता. तर जुन्या चालीरीतीप्रमाणे अक्षतादेखील गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी वधू-वरांच्या डोक्यावर टाकण्यात आल्या. या सर्वांचे उपस्थित सर्वच मंडळींकडून कौतुक होत होते.

Web Title: Ram More from Sarwade, Kolhapur district, performed a communal recitation and singing of Haripatha on the occasion of his wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.