Municipal Election 2026: प्रचाराच्या रणधुमाळीत अवकाळी पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:43 IST2026-01-13T11:42:10+5:302026-01-13T11:43:54+5:30
पावसामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले

छाया: नसीर अत्तार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सोमवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांची पळापळ झाली. काही ठिकाणी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
हवामान खात्याने राज्यात १० ते १२ जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा अंदाज वर्तविला होता. जिल्ह्यात सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाला सुरुवात झाली.
कसबा बावड्यापासून ते शाहू टोल नाक्यापर्यंत आणि तावडे हॉटेलपासून छत्रपती शिवाजी पुलापर्यंत शहरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवारांना प्रचार सभा आणि फेऱ्या आटोपत्या घ्याव्या लागल्या. दरम्यान, पावसामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले.