Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांना द्यायचेत पाच लाख, अटकेतील पंटर खोतचे फिर्यादीशी संभाषण

By भीमगोंड देसाई | Updated: March 21, 2025 12:21 IST2025-03-21T12:20:28+5:302025-03-21T12:21:00+5:30

लाचप्रकरणातील एफआरआयमध्ये धक्कादायक माहिती

Punter Suresh Khot who was arrested for giving five lakhs to Shahuwadi Tehsildar had a conversation with the complainant | Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांना द्यायचेत पाच लाख, अटकेतील पंटर खोतचे फिर्यादीशी संभाषण

Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांना द्यायचेत पाच लाख, अटकेतील पंटर खोतचे फिर्यादीशी संभाषण

भीमगोंड देसाई

कोल्हापूर : पाच लाख रुपये तहसीलदार चव्हाणसाहेबांना द्यायला पाहिजेत, असे संभाषण तक्रारदार आणि पाच लाखांची लाच घेताना मिळालेला पंटर सुरेश जगन्नाथ खोत यांच्या मोबाईलवर झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआरआय) आले आहे. पंटर खोत याने पाच लाख रुपये तहसीलदार यांना द्यायला लागतात म्हणून घेतले आहेत. परिणामी शाहूवाडी तहसील कार्यालयातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. या लाच प्रकरणात तहसीलदारही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत म्हणूनच त्यांनी स्वत:हून पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली आहे.

अनेक दिवसांपासून शाहूवाडी तहसील कार्यालयातील खाबूगिरीच्या तक्रारी सुरू होत्या. त्यासंबंधीचे वृत्त आले की तहसीलदार आपली बदनामी केली म्हणून नोटीस काढून बातमीदारांवरही दबाव आणत होते. परंतु या प्रकरणात संशयाची सुई त्यांच्याकडेच असल्याचे एफआरआयमधील लेखी नोंदीवरून दिसते. मलकापूर येथील तक्रादाराची ३ एकर १२ गुंठे जमीन सावे येथे आहे. त्यातील ६० गुंठे जमीन नागपूर- रत्नागिरी रस्त्यात संपादित झाली. त्याचे तक्रारदारांना ३ कोटी ४३ लाख रुपये मिळाले. 

तक्रारदारांकडे चांगले पैसे असल्याची माहिती शाहूवाडी तहसीलमधील दलालांनी कळाली. त्यांनी तक्रारदाराच्या उर्वरित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जणांची नियमबाह्य नावे लावली. ती नावे कमी करावी, म्हणून तक्रारदाराने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालयात अर्ज केला. यासाठी ते वारंवार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे जावून पाठपुरावा करत होते पण त्यांच्या कामात दिरंगाई होत राहिली. 

शाहूवाडी तहसील कार्यालयात प्रलंबित असलेले सावे येथील गटनंबर ६१६ बाबतचे काम तहसीलदार चव्हाण यांच्याकडून पूर्ण करून देतो, त्यासाठी चव्हाण यांना देण्यासाठी पाच लाखांची मागणी खाेत याने तक्रारदाराकडून केली. त्यावेळी तक्रारदार याने काम होणार का, असे विचारल्यावर चव्हाणसाहेबांकडून काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी, त्यासाठी तुम्ही पाच लाख तयार ठेवा, असे खोत याने सांगितले. त्यानंतर सापळा रचला. पाच लाख रुपये घेताना खोत बुधवारी सापडला. 

साहेबावर ट्रॅप पण ..

लाचेचा ट्रॅप साहेबांवरच होता पण साहेब पटाईत असल्याने सराईतपणे चकवा दिला. पंटरला पुढे करून वसुली करताना अप्रत्यक्षपणे साहेबांचीही ढपलेगिरी समोर आली आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. साहेबांना शाहूवाडीत आणण्यासाठी कुणी हातभार लावला होता, त्यासाठी काय देवघेव झाली होती याचीही चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामाबद्दल आमदार विनय कोरे यांच्याकडेही लोकांनी तक्रारी केल्या होत्या.

साहेब बोललाय का कधी..?

तक्रारदार व खोत यांच्यात लाचेची रक्कम जास्त असल्याबाबत राधाकृष्ण धाब्याजवळ प्रत्यक्ष चर्चा झाली. तक्रारदाराने आम्ही रक्कम कमी करण्याबाबत साहेबांना भेटतो, असे सांगितल्यावर पंटर खोत ‘साहेब बोलतो का कधी, बोललाय का कधी कुणाकडं..? असे म्हणाला. त्यानंतर चव्हाण साहेबांना पैसे कमी करण्याबाबत विनंती करतो, असे सांगून तक्रारदार तेथून आला आणि ही माहिती लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांना दिली.

२७ जानेवारीपासून मागावर..

पंटर खोत याने तक्रारदाराकडून पहिल्यांदा २७ जानेवारी २०२५ रोजी पाच लाख रुपये तहसीलदार चव्हाण यांचे नाव सांगून मागितले. त्यानंतर म्हणजे १३ मार्चपर्यंत वारंवार खोत याने त्यांचे नाव घेऊन लाचेची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुम्ही थेट चव्हाण साहेबांना भेटला तरी लाचेच्या पैशांत काही कमी होणार नाही, माझ्याकडेच द्या, असेही संभाषण तक्रारदारासाेबत पंटर खोत याने केले आहे. हे प्रकरण उघड झाल्यामुळे अशी शाहूवाडीतील आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Punter Suresh Khot who was arrested for giving five lakhs to Shahuwadi Tehsildar had a conversation with the complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.