Kolhapur: राधानगरी धरणाला वक्रकार दरवाजे बसविण्यास विरोध, शाहूकालीन जलविद्युत केंद्र सुरू करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:57 IST2025-09-13T18:57:17+5:302025-09-13T18:57:39+5:30
धरण स्थळावरील जुने वीज निर्मिती केंद्र २०१७ पासून बंद

Kolhapur: राधानगरी धरणाला वक्रकार दरवाजे बसविण्यास विरोध, शाहूकालीन जलविद्युत केंद्र सुरू करण्याची मागणी
राधानगरी : राधानगरीधरणावर नवीन संडवा बांधकाम करणे व सेवा द्वारांची दुरुस्ती, पूर नियंत्रण संबंधात शुक्रवारी राधानगरी पंचायत समिती येथे खासदार शाहू छत्रपती, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी व नागरिक यांच्यामध्ये सल्लामसलत कार्यशाळा झाली. राधानगरीतील नागरिकांनी धरणाला नवीन वक्रकार दरवाजे बसविण्यास तीव्र विरोध करत शाहूकालीन जुने वीज निर्मिती केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली.
धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाची विसर्ग क्षमता वाढविण्यासाठी, पूर नियंत्रण करण्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घेता, नवीन वक्र दरवाजे बसविणे गरजेचे असल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजीत म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. २००५ साली राधानगरी धरणाचे एक सेवाद्वार अडकून बसल्याचा प्रसंग घडला. या घटनेला आज वीस वर्षे पूर्ण झाली. तरीही या सेवा द्वारांची कोणतीही दुरुस्ती का केला नाही, असा प्रश्न गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांनी उपस्थित केला.
धरण स्थळावरील जुने वीज निर्मिती केंद्र २०१७ पासून बंद आहे, ते तत्काळ सुरू करून जर संपदा विभागाने या जलविद्युत केंद्रास पाणी देण्यास मान्यता द्यावी, असे मत नंदकिशोर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. दीपक शेट्टी, सुहास निंबाळकर, अनिल बडदारे यांनी प्रश्न उपस्थित केले. बैठकीस जागतिक बँकेचे प्रतिनिधी मेघा कश्यप, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, समीर निरुखे, मोहन पाटील, फारूक नावळेकर उपस्थित होते.
धरण स्थळावरील जुन्या वीज निर्मिती केंद्राचा विषय जलसंपदा विभागाने प्राधान्याने घेऊन जुने वीज निर्मिती केंद्र तत्काळ सुरू करावे. -शाहू छत्रपती, खासदार