Kolhapur Municipal Election 2026: तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल, नोटीस देवूनही १६ कर्मचारी गैरहजरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:13 IST2025-12-27T17:12:50+5:302025-12-27T17:13:12+5:30
आतापर्यंत किती अर्जांची विक्री झाली..

Kolhapur Municipal Election 2026: तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल, नोटीस देवूनही १६ कर्मचारी गैरहजरच
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर ४९१ अर्जांची विक्री झाली. गेल्या तीन दिवसांत १५३५ अशी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. परंतु, आतापर्यंत केवळ आठ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे भरली आहेत.
प्रभाग क्रमांक २० ई मधून राजू आनंदराव दिंडोर्ले, ११ ड मधून विजय दरवान, ११ अ मधून निलांबरी अशोक साळोखे, १३ अ मधून स्वाती संतोष कदम तर १४ क मधून अमर समर्थ यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. दिंडोर्ले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.
गेल्या तीन दिवसांत १५३५ नामनिर्देशपत्रांची विक्री झाली असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार असतील आणि सोमवारी, मंगळवार असे दोन दिवस मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाच आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा मंगळवार (दि.३० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार आहेत.
वाचा : महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान
मतदान यंत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंट्रोल युनिटसह इलेक्ट्रिक मतदान यंत्रे ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी कागल तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील ४९४ कंट्रोल युनिटसह ११२१ इलेक्ट्रिक मतदान यंत्रे ताब्यात घेतली. कागल तहसीलकडून २७९ कंट्रोल युनिट, १५५ मतदान यंत्रे तर पन्हाळा तहसीलकडून २२७ कंट्रोल युनिट व ६२४ मतदान यंत्रे ताब्यात घेतली जाणार आहेत.
१६ कर्मचारी गैरहजरच
निवडणुकीच्या कामावर राहण्याचे आदेश देऊनही ५० कर्मचारी हजर न होता, दांडी मारली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नोटीस दिल्यानंतर त्यापैकी ३४ कर्मचारी कामावर हजर झाले; परंतु १६ कर्मचारी अद्याप हजर झालेले नाहीत. त्यांचे खुलासे पाहून पुढील कारवाई केली जाणार आहे.
मतदार याद्या प्रसिद्धीस सात दिवसांची मुदतवाढ
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी मतदार याद्या प्रसिद्धीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला.
याआधीच्या आदेशानुसार आज, शनिवारी सर्व २० प्रभागांच्या मतदार याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करायच्या होत्या. महापालिका प्रशासनाने तशी तयारीही केली होती. मतदार याद्या मिळण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता आणखी सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.