Kolhapur- कारण-राजकारण: व्यासपीठावर कोण-कोण होते बसले, पाठीत खंजीर कुणी खुपसला?; नंदाताईंच्या इशाऱ्याची जिल्ह्यात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:05 IST2025-08-01T16:05:13+5:302025-08-01T16:05:58+5:30
‘गोकुळ’ ‘केडीसी’चा संदर्भ देत नंदाताईंनी अप्रत्यक्षरित्या जिल्ह्याच्या नेतृत्वालाही इशारा दिला

Kolhapur- कारण-राजकारण: व्यासपीठावर कोण-कोण होते बसले, पाठीत खंजीर कुणी खुपसला?; नंदाताईंच्या इशाऱ्याची जिल्ह्यात चर्चा
राम मगदूम
गडहिंग्लज : विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत, आमच्या व्यासपीठावर राहून आमच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना कुठेही थारा मिळू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कानडेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यासपीठावर कोण-कोण होते? त्यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? ‘त्या’ कुणा-कुणाला जागा दाखवणार? याचीच चर्चा ‘गडहिंग्लज’सह जिल्हाभर रंगली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या दोघींनीही निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारीची माळ राजेश पाटील यांच्या गळ्यात पडली. परंतु, निवडणुकीनंतर आमदार पाटील व कुपेकर यांच्यात आलेला दुरावा कायम राहिला. किंबहुना, दोघांच्या पाडा-पाडीच्या राजकारणामुळेच शिवाजीराव पाटील यांना चाल मिळाली ही वस्तुस्थिती आहे. परंतु, दोघांनीही निकालाचा ‘बोध’न घेतल्यामुळेच ‘शक्तिपीठ’ चंदगडमध्ये येत आहे.
मनातील ‘खदखद’
लोकसभा निवडणुकीपूर्वी चंदगड मतदारसंघात काढलेल्या संविधान बचाव दिंडीमुळे ‘मविआ’चे नेते कार्यकर्ते एकत्र आले. त्याचाच फायदा शाहू महाराजांना झाला. मात्र, लोकसभेच्या निमित्तानेच सक्रिय झालेल्या ‘नंदाताईं’ची उमेदवारी न रूचल्यामुळे आघाडीतील बहुतेकांनी अप्पी पाटील यांना उघडपणे साथ दिली. म्हणूनच आपल्याला एकाकी पाडल्याचे शल्य नंदाताईंना आहे. किंबहुना, त्यांनी मनातील खदखदच कानडेवाडीच्या बैठकीत बोलून दाखवली.
निकालावर ‘भाष्य’
शक्तिपीठ महामार्गात ‘चंदगड’चा समावेश करण्याची मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केल्यामुळे त्यांचे विरोधक पुन्हा एकवटले आहेत. त्यात राजेश पाटील यांच्यासह नंदाताईंच्या विरोधात गेलेली मंडळीच पुढे आहेत. त्यांच्यासोबत कसे जायचे? हाच प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळेच त्यांनी ‘ईव्हीएम’च्या तपासणीनंतर निवडणुकीच्या निकालावर ‘भाष्य’ केले आहे.
नेतृत्वालाच ‘इशारा’
विधानसभा निवडणुकीत नंदाताईंची उमेदवारी दाखल करून गेल्यानंतर खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील दोघेही ‘चंदगड’कडे फिरकले नाहीत. त्यामुळे अप्पींसोबत गेलेले नेते-कार्यकर्ते माघारी फिरले नाहीत. काहींनी व्यासपीठावर बसून तर काहींनी पडद्यामागे राहून करायचे तेच केले. म्हणूनच, ‘गोकुळ’ ‘केडीसी’चा संदर्भ देत नंदाताईंनी अप्रत्यक्षरित्या जिल्ह्याच्या नेतृत्वालाही इशारा दिला आहे.