‘चंदगड’च्या उमेदवारीची उत्कंठा कायम, शरदचंद्र पवार पक्षाचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:39 IST2024-10-26T15:37:17+5:302024-10-26T15:39:16+5:30
नंदाताईंचीही जोरदार तयारी!

‘चंदगड’च्या उमेदवारीची उत्कंठा कायम, शरदचंद्र पवार पक्षाचा सावध पवित्रा
राम मगदूम
गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवारांच्या पहिल्या यादीत ‘चंदगड’च्या उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे येथील उमेदवारीची उत्कंठा कायम आहे. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जागेबाबत वरिष्ठांनी कमालीची सावधगिरी घेतल्याचे दिसत आहे.
‘महायुती’तर्फे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु, पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे उत्सुकता कायम आहे.
दोन दिवसांपूर्वी महागावमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस, उद्धवसेना व पवार पक्षाचे अमरसिंह चव्हाण यांनी बाभूळकरांना वगळून मेळावा घेतला. त्या वेळी ‘आपल्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, अन्यथा निराळा विचार करावा लागेल’ असा इशाराही दिला. म्हणूनच, येथील उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, ‘मविआ’कडून इच्छुक असणारे काँग्रेसचे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील व उद्धवसेनेचे शिंत्रे यांनी शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. प्रसंगी ‘तुतारी’च्या चिन्हावर लढण्याची तयारीदेखील दाखवली आहे. त्यामुळे चंदगडमध्ये ‘तुतारी’ कोण फुंकणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र लढण्याची तयारी..!
महागाव येथील मेळाव्याच्या माध्यमातून ताकद दाखवलेल्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करतानाही शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. सोमवारी (२८) तिघांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यापैकी सर्व संमतीने एकाचे नाव निश्चित करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची व्यूहरचना सुरू आहे. म्हणूनच पवारांनी येथील उमेदवारीबाबत सावध भूमिका घेतली आहे.
नंदाताईंचीही जोरदार तयारी!
लोकसभा निवडणुकीप्रमाणे ‘मविआ’चे सर्व सहकारी विधानसभेलाही सोबत राहतील, अशी नंदाताईंची अपेक्षा होती. मात्र, सुरुवातीपासूनचा त्यांच्या विरोधातील सूर आजही कायम आहे. परंतु, त्याची तमा न बाळगता निवडणुकीला सामोरे जाण्याची जोरदार तयारी त्यांनीही चालवली आहे.