Kolhapur Municipal Election 2026: आघाडी, महायुतीचे तोरण.. ठरले बंडखोरीचे कारण; नाराजी दूर कशी करायची, नेत्यांपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:12 IST2025-12-29T18:07:31+5:302025-12-29T18:12:21+5:30
पक्षाने उमेदवारी नाकारली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असे निरोप नेते मंडळींना दिले जाऊ लागले आहेत

Kolhapur Municipal Election 2026: आघाडी, महायुतीचे तोरण.. ठरले बंडखोरीचे कारण; नाराजी दूर कशी करायची, नेत्यांपुढे आव्हान
कोल्हापूर : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (ए. पी.), काँग्रेस यांच्याकडे उमेदवारी मागितलेल्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीअंतर्गत उमेदवारी निश्चित करताना नेते मंडळींची मोठी दमछाक होत आहे. ‘निवडणुकीची तयारी करा, प्रभागात फिरा’ अशा सूचना सर्वांनाच दिल्यामुळे इच्छुक प्रत्येक उमेदवाराने प्रचार सुरू केला आहे. आता उमेदवारी निश्चित करताना नाराजीचा सामना करावा लागत आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून आज, सोमवार व मंगळवार असे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. या दोन दिवसात बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची तसेच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. निवडणूक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांना ‘तयारीला लागा’ अशा सूचना दिल्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, असे समजून इच्छुक उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी जाहीर व्हायची असतानाही मतदारांना वाटल्या जाणाऱ्या प्रचारपत्रकांवर पक्षाचे चिन्ह, नेत्यांची छायाचित्रे छापून ती वाटली जाऊ लागली आहेत.
वाचा : महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय
काँग्रेस पक्षाने ६१ उमेदवार निश्चित केले. परंतु, महायुतीतील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (एपी) पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. काही जागांवर दोन - दोन पक्षाचे नेते, इच्छुक आग्रही राहिल्याने कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न पक्षनेतृत्त्वासमोर आहे. एकीकडे निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना दुसरीकडे जागा वाटप होत नाही, उमेदवारांची नावेही घोषित होत नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. प्रचार सुरू असताना उमेदवारी नाकारली तर मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होणार आहे.
वाचा : उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरले शिरोली; तीन महापालिकांमधील नवी नावं यादीत शिरली!
उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असताना माघार घ्या म्हणून सांगायला गेले, तर कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत राहणार नाही. ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत, तेथे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजीही सुरू झाली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असे निरोप नेते मंडळींना दिले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ही नाराजी कशी दूर करायची, बंडखोरी कशी टाळायची, असा गंभीर प्रश्न नेत्यांना सतावत आहे.
वाचा : इचलकरंजीत भाजप-शिंदेसेना युतीचं जमलं, ५४-११ चा फॉर्म्युला निश्चित; राष्ट्रवादी गुलदस्त्यातच
भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
नाराजी वाढणार, बंडखोरी होणार, याची कुणकुण लागताच भाजपचे पदाधिकारी सोशल मीडियाचा वापर करून उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका, पुढे आपल्यासाठी काय करता येईल, यावर पक्ष विचार करत असल्याचे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसमध्येही बंडखोरीची शक्यता
शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक १०मध्ये काँग्रेसकडून अक्षय विक्रम जरग इच्छुक आहेत, तर त्याच जागेवर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी त्यांचे चुलत बंधू राहुल इंगवले यांच्यासाठी आग्रह धरला आहे. येथे जरग यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.