Kolhapur: गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठे स्ट्रक्चर, आवाजाची ट्रायल चालणार नाही; पोलिसांचा सज्जड इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:14 IST2025-09-01T12:14:30+5:302025-09-01T12:14:54+5:30
कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी रविवारी (दि. ३१) शहरातील ध्वनियंत्रणा, लाईट्स, जनरेटर, ...

Kolhapur: गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठे स्ट्रक्चर, आवाजाची ट्रायल चालणार नाही; पोलिसांचा सज्जड इशारा
कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी रविवारी (दि. ३१) शहरातील ध्वनियंत्रणा, लाईट्स, जनरेटर, स्क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळांची बैठक घेतली. पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये झालेल्या बैठकीत लाईट्सचे मोठे स्ट्रक्चर आणि मिरवणुकीच्या आधीच होणारी ध्वनियंत्रणांची ट्रायल चालणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला. तसेच आवाज मर्यादा आणि वेळेचे पालन न करणाऱ्या मंडळांच्या ध्वनियंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल करणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी स्पष्ट केले.
राजारामपुरीसह शहरात ठिकठिकाणी झालेल्या गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले. विसर्जन मिरवणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी तातडीने रविवारी शहरातील सर्व मंडळांसह मंडप व्यावसायिक, ध्वनियंत्रणा, लेसर, लाईट्स, स्क्रीन आणि जनरेटर व्यावसायिकांची बैठक घेतली. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांनी आगमन मिरवणुकीतील अतिउत्साह दाखवलेल्या मंडळांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगितले.
सूचनांचे उल्लंघन केल्यास पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेणार नाहीत. संबंधित मंडळातील पदाधिऱ्यांसह साऊंड सिस्टीमस्, लाईट्स, जनरेटरचे मालक, चालकांवरही गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच लाईट्स स्ट्रक्चरची उंची १२ फूट आणि रुंदी १० फूट एवढीच असेल, अशी सूचना केली.
शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनीही मंडळांना कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना दिल्या. नियमांचे पालन न केल्यास यापुढे मिरवणुकीत ध्वनियंत्रणांना परवानगीच मिळणार नाही. उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन रावडे यांनी केले. तसेच उपअधीक्षक पाटील यांनी मंडळांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशा कलमांखाली गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, संतोष डोके, सुशांत चव्हाण यांच्यासह दोनशेहून अधिक मंडळांचे पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.
या आहेत महत्त्वाच्या सूचना
- मिरवणुकीत लेसर, धूर फवारणी करणारे स्मोकर वापरू नका
- कर्कश ध्वनी निर्माण करणारे प्रेशर मीड आणि आग ओकणाऱ्या यंत्रणांना परवानगी नाही.
- स्ट्रक्चर १२ बाय १० चे असेल
- मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन, पासिंग आवश्यक
- लेसर, उच्च ध्वनियंत्रणांना बंदीच
- ध्वनियंत्रणांची ट्रायल घेताच जप्तीची कारवाई
- मिरवणुकीत इतर मंडळांची अडवणूक चालणार नाही
- जनरेटरची तपासणी आवश्यक
मंडळे, व्यावसायिकांना नोटिसा
पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस पोलिसांनी शहरातील सर्व मंडळे आणि व्यावसायिकांना दिली. मिरवणुकीत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही पोलिसांनी मंडळे आणि व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.