कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी, कशी आहे व्यवस्था.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:38 IST2025-09-01T18:35:23+5:302025-09-01T18:38:27+5:30
पंचगंगा नदीत विसर्जनास बंदी

कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी, कशी आहे व्यवस्था.. वाचा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी १२१६ ट्रॅक्टर्सची सोय केली असून १००३ काहिलींची व्यवस्था करण्यात आली आहे तर या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ११२२ जुन्या विहिरी आणि खणींची निश्चिती करण्यात आली आहे.
गेली काही वर्षे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल असून यंदाही मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याने याबाबत नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींनी यासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. ५२ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजना राबविण्यात आली असून मूर्ती परत घेणाऱ्या ११२ कुंभारबांधवांचीही निश्चिती करण्यात आली आहे. २२९ घंटागाडी आणि खतनिर्मिती आणि अंतिम व्यवस्थापनासाठी १०९१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम ग्रामस्थांच्याही अंगवळणी पडला असून आपल्याच गावाशेजारचे वापरातील पाणी दूषित होऊ नये यासाठी ग्रामस्थांनीही कंबर कसली आहे. गावांमधील मान्यवरांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण गावातील काहिलीत मूर्ती विसर्जित करत असून प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत आहे.
शहरातील सर्व प्रभागात १६० गणेश विसर्जन कुंड, अडीच हजार कर्मचारी
कोल्हापूर : घरगुती गौरी, गणपती विसर्जन येत्या मंगळवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती आणि गौरी विसर्जनासाठी शहरातील सर्व प्रभागात १६० कृत्रिम कुंड तयार केले आहेत. अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असणार आहेत. गणेश मूर्ती संकलनासाठी २०५ टेम्पो, ४८० हमाल, सात जेसीबी, सात डंपर, आठ ट्रॅक्टर, चार पाण्याचे टँकर, दोन बुम, पाच रुग्णवाहिका, पाच साधे तराफे, दहा फ्लोटिंगचे तराफे तैनात ठेवण्यात येणार आहेत. यंदा पहिल्यादांच एक क्रेन जादा ठेवण्यात आली आहे.
इराणी खाण येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सर्व साधनांसह असणार आहेत. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी मोठी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांची १३ पथके तयार आहेत. सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. भक्तांनी विसर्जन कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून टेम्पोतून वाहतूक करून इराणी खाणीत विसर्जित करण्यात येणार आहेत.
खत तयार होणार
प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी चार प्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संकलित निर्माल्य पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पिटल येथे खत तयार करण्यासाठी स्वतंत्र खड्ड्यात टाकण्यात येणार आहे. अवनी, एकटी, वसुंधरा व इतर सेवाभावी संस्थेच्या १५० महिला निर्माल्याचे विलगीकरण करून खत निर्मितीचे काम करणार आहेत.
पंचगंगा नदीत विसर्जनास बंदी
पंचगंगा नदी आणि परिसरातील तलावात, नैसर्गिक स्रोताच्या पाण्यात मूर्ती, गौराई विसर्जनास बंदी आहे. यामुळे भक्तांनी आपल्या परिसरात महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडातच मूर्ती, गौराईचे विसर्जन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
शहरातील भक्तांनी महापालिकेतर्फे व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडातच गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जित करावे. नैसर्गिक जलस्रोताचे प्रदूषण होऊ नये, म्हणून यंदाही महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. - के. मंजूलक्ष्मी, प्रशासक, महापालिका, कोल्हापूर.