Kolhapur Election Result:कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा दारुण पराभव, समोर आली चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:08 IST2022-04-16T13:08:02+5:302022-04-16T13:08:43+5:30
Kolhapur Election Result Live: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत.

Kolhapur Election Result:कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा दारुण पराभव, समोर आली चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कोल्हापूर - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्याकडे १८ हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे. तर सत्यजित कदम हे मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. दरम्यान, कोल्हापूर उत्तरमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव होणार हे स्पष्ट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो, आम्ही या निवडणुकीत विकासाच मुद्दा मांडला होता. आम्ही राज्यात पाच वर्षे आणि केंद्रात सात वर्षे सत्ता असताना काय केलं आणि आता विजय मिळाल्यास काय करू याचा आराखडा मतदारांसमोर मांडला. तसेच विरोधकांनाही त्यांची येथे सत्ता असताना त्यांनी काय केलं हे मांडण्याचं आवाहन केलं, असे ते म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघा़डीवर होत्या. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी सत्यजित कदम यांच्यावर मोठी आघाडी घेतली. ही आघाडी मधल्या काही फेऱ्यात कदम यांनी कमी केली. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धात ही आघाडी अधिकाधिक वाढत देली आणि जयश्री जाधव यांचा विजय निश्चित झाला.