एकमत करा, कोल्हापूरच्या हद्दवाढ प्रस्तावावर १५ व्या मिनिटाला सही; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:50 IST2026-01-13T11:48:24+5:302026-01-13T11:50:41+5:30
‘मिसळ कट्ट्या’वर मांडले कोल्हापूरचे व्हिजन

छाया: आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : कोणत्याही शहराच्या विकासासाठी हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. कोल्हापूरचे नेते हळूहळू एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत. नेत्यांचे आणि जनतेचे एकमत जेव्हा होईल त्यावेळी १५ व्या मिनिटाला मी त्या प्रस्तावावर सही करेन, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
भाजपच्यावतीने आयोजित ‘मिसळ कट्टा’ उपक्रमामध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना टोलमाफीपासून ते दिलेल्या निधीपर्यंतची आठवण करून दिली. अभिनेते स्वप्नील राजशेखर, चारूदत्त जोशी आणि कृष्णराज महाडिक यांनी ही प्रकट मुलाखत घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हद्दवाढीचा विषय २०१४ साली जेव्हा पुढे आला, तेव्हा आदरणीय हयात नसलेल्या मंडळींनी टोकाचा विरोध केला. मी घाबरून गेलो. म्हणून मग प्राधिकरण स्थापन केले. परंतु, हद्दवाढ हाच खरा उपाय आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांच्या शिष्टमंडळाला अर्धा, पाऊण तास वेळ देऊन त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी तयारी आहे. हद्दवाढीनंतर आधीच्या गावातील कोणत्याही करामध्ये पाच वर्षे वाढ करायची नाही हे राज्याचे धोरण आहे.
वाचा : मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल
महाराष्ट्रातील ५० टक्के जनता ही ४० हजार गावांत राहते आणि ५० टक्के जनता ४०० शहरांमध्ये राहते. त्यातील ९० टक्के जनता ही या २९ शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचे रस्ते, पाणी आणि अन्य मूलभूत प्रश्न सातत्याने चर्चेत येतात. देशातील ६५ टक्के जीडीपी हा शहरांमधून मिळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शहर सुधारणांसाठी जाणीवपूर्वक मोठ्या निधीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी फडणवीस यांनी लखपती दीदी, कोल्हापूर-बंगळुरू इंडस्ट्रियल काॅरिडॉरमुळे कोल्हापूरला येणारे महत्त्व, स्वामी विवेकानंद यांचा युवकांना संदेश, आपले मार्गदर्शक, सोशल मीडिया अशा विविध विषयांवर मते व्यक्त केली. महेश जाधव, विजय जाधव, आदिल फरास, सुजित चव्हाण यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.
कोल्हापूरकरांना टोल टोचत होता
कोल्हापूरमध्ये चांगले रस्ते झाले. परंतु, आमच्याच शहरात टोल का? असे म्हणणाऱ्या कोल्हापूरकरांना टोल टोचत होता. तेव्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही असा निर्णय घेतला आणि कोल्हापूरकरांना भरावे लागणारे तब्बल ७०० कोटी रुपये आपल्या सरकारने भरले, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
रिंग रोड आणि फ्लायओव्हर
कोल्हापूर शहराची क्षमता आणि वाढ याच विचार करता याठिकाणी टनेलची गरज भासणार नाही. परंतु, रिंग रोडचे नियोजन आणि काही प्रस्तावित फ्लायओव्हरची उभारणी केली तर कोल्हापूरच्या वाहतुकीची समस्या कमी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पंचगंगा प्रदूषणमुक्त आणि कोल्हापूर पूरमुक्त
पंचगंगा प्रदूषण आणि पूरमुक्तीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पंचगंगेमध्ये काठावरची शहरे, गावे आणि उद्याेग यांचे सांडपाणी जाते. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात आहेत. महाराष्ट्रातील उद्योगांकडून मिळणाऱा पैसा हा महाराष्ट्रातीलच पर्यावरण सुधारणा आराखड्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाला पाठवला आहे. त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी सात वर्षे लागतील. परंतु, तीन, चार वर्षांत पाण्याचा दर्जा चांगला होण्यास सुरूवात होईल. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पुराचे सुमारे ३५ टीएमसी पाणी तहानलेल्या मराठवाड्याला देण्याच्या प्राथमिक कामांनाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांत १०० टक्के कोल्हापूर पूरमुक्त होईल.
जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारू
कोल्हापूरच्या क्रीडाविषयक परंपरेचा कौतुकाने उल्लेख करत फडणवीस यांनी यावेळी कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याचा शब्द दिला.
कोल्हापूरच्या विमानसेवेचा चौपट विस्तार
विमानसेवेबाबत विचारता फडणवीस म्हणाले, आता विमानसेवा ही लक्झरी राहिलेली नाही. तर कोणत्याही उद्योगांसाठी आणि शहरांच्या विकासासाठी एअर कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची ठरत आहे. आम्ही कोल्हापूरचा रन-वे वाढवण्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी दिला आहे. एकदा का मोठी विमाने सुरू झाली की, मग कोल्हापूरच्या विमानसेवेचा चौपट विस्तार होईल.
आता महिलांना कोणीही रोखू शकणार नाही
आम्ही १५०० रुपये लाडक्या बहिणांना दिले. आता आम्ही त्यांना लखपती दीदी बनवणार आहोत. राज्यात आतापर्यंत ५० लाख दीदी लखपती झाल्या आहेत. मी यापुढे नूतन नगरसेवक आणि महापौरांना वाॅर्डामध्ये किती रस्ते केले, गटारे केली हे विचारणार नाही. तर तुम्ही किती लखपती दीदी केल्या हे विचारणार असल्याचे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सर्व नेत्यांचे उपस्थितांना आवाहन
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, प्रकाश आवाडे, ललित गांधी यांच्यासह मान्यवरांनी स्टेजवर येत विजयाची खूण दाखवत उपस्थितांना आवाहन केले.