कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 18:35 IST2022-08-09T18:35:12+5:302022-08-09T18:35:57+5:30
नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत

कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अनिल पाटील
सरुड : संततधार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण आज, मंगळवारी शंभर टक्के भरले. धरणातून ३२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदी पात्रात केला जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी कडवी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासात कडवी धरण क्षेत्रात तब्बल २१० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडवी नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नदीकाठची पिके पाण्याखाली
कडवी धरणाची २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणात ७१.२४ दलघमी पाणीसाठा झाला असुन पाणी पातळी ६०१ . २५ मी. वर पोहचली आहे. धरणातून विसर्ग सुरु केल्याने कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून नदीला पूर आला आहे. नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.
पूरस्थिती गंभीर होण्याची चिन्हे
कडवी नदीवरील वालुर, भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते - सावर्डे, पाटणे - सरुड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे व चांदोली तसेच कडवी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे सरुड नजीक वारणा व कडवी नदीच्या संगमा दरम्यान पूरस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहे.