Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटलांच्या जागांची कुंडली बाहेर काढण्याची वेळ आली, आमदार विनय कोरे यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:15 IST2026-01-05T16:14:08+5:302026-01-05T16:15:05+5:30
पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप

Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटलांच्या जागांची कुंडली बाहेर काढण्याची वेळ आली, आमदार विनय कोरे यांचा पलटवार
कोल्हापूर : महिलांना रोजगार मिळावा यासाठी आयटी पार्क मधील जागा जनसुरज्यचे आमदार अशोक माने यांच्या संस्थेसाठी घेतली आहे. जनसुराज्याचे चांगले काम न पाहणाऱ्या लोकांनी आता यावर गरळ ओकायला सुरुवात केली आहे. या जागेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आमदार सतेज पाटील यांच्याकडील जागांची कुंडली बाहेर काढण्याची वेळ आता आली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप त्यांच्याकडून सुरू आहेत, असा पलटवार जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रविवारी एका प्रचार सभेत बोलताना विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आयटी पार्क मधील जागेच्या खरेदी व्यवहारावरून जनसुराज्य पक्षावर टीका केली. महापालिकेसाठी राखीव ठेवलेली ५०० कोटी रुपयांची जागा आमदार कोरे यांनी केवळ ३० कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. त्यावर बोलताना आमदार कोरे यांनी पलटवार केला.
वाचा : आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप
उद्योगासाठी राखीव असलेली जागा आमदार अशोक माने यांच्या संस्थेने रेडीरेकनर दराने घेतली. त्यातून कोल्हापुरातील महिलांसाठी रोजगार निर्माण केला जाणार आहे. जनसुराज्यचे चांगले काम न पाहवणाऱ्या लोकांनी आता गरळ ओकायला सुरुवात केली आहे. त्यांनी जागेचाच विषय काढला असेल तर येत्या दोन-तीन दिवसात त्यांच्या अनेक जागांची कुंडली बाहेर काढू. हॉटेल, कृषी महामंडळ आणि वॉटर पार्कची जागा त्यांनी कशी लाटली याची कुंडली माझ्याकडे आहे, असे आमदार कोरे म्हणाले.
वाचा : इचलकरंजीत ५ प्रभागांत हाय व्होल्टेज लढती
महापालिकेत जनसुराज्यकडून पक्षीय राजकारणाला सुरुवात
कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वप्रथम जनसुराज्यने पक्षीय राजकारणाला सुरुवात केली. पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात हे जनसुराज्यने सिद्ध केले. त्यानंतर काँग्रेसने जनसुराज्यचा आदर्श घेत आमची री ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यावर बोलू नये. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने ते बिन बुडाचा आरोप करीत असल्याचे आमदार कोरे म्हणाले.