Kolhapur: महापालिकेच्या धामधुमीतच भाजपच्या जिल्हा परिषदेसाठी मुलाखती, साडेसहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:01 IST2026-01-07T13:01:00+5:302026-01-07T13:01:39+5:30
तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती

Kolhapur: महापालिकेच्या धामधुमीतच भाजपच्या जिल्हा परिषदेसाठी मुलाखती, साडेसहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केले अर्ज
कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपने मंगळवारपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. बाराही तालुक्यातून साडे सहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पहिल्या दिवशी कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती नागाळा पार्कातील भाजपच्या कार्यालयात घेण्यात आल्या.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचाराने वेग घेतला आहे. अशातच आज, उद्या जिल्हा परिषदेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आधीच अर्ज मागवून ठेवले होते. आता तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कदाचित जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अंबरिश घाटगे यांनी मुलाखती घेतल्या. आज बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा तर उद्या गुरुवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.