Ichalkaranji Municipal Election 2026: मनधरणी होणार की मैत्रीपूर्ण लढतीसाठी मैदानात राहणार; दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:31 IST2026-01-01T17:30:40+5:302026-01-01T17:31:48+5:30
तडजोड न झाल्यास दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता

Ichalkaranji Municipal Election 2026: मनधरणी होणार की मैत्रीपूर्ण लढतीसाठी मैदानात राहणार; दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार
अतुल आंबी
इचलकरंजी : येथील महापालिका निवडणुकीत महायुतीमधील उमेदवारी वाटपाचा घोळ कायम आहे. ६५ जागांसाठी तिन्ही पक्षांत मिळून एकूण ७९ जण पक्षांच्या अधिकृत चिन्हावर, तर दहाजण अपक्ष असे ८९ जण रिंगणात उतरले आहेत. यामधील कितीजणांची मनधरणी होणार आणि कितीजण मैत्रीपूर्ण लढतीसाठी मैदानात राहणार, यासाठी दोन दिवसांचा कालावधी आहे. यामध्ये पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या ६५ जागांसाठी महायुतीकडे मोठ्या संख्येने उमेदवारी मागणी झाली. त्यामध्ये चाळण लावत निर्णय होईपर्यंत पक्षश्रेष्ठींना घाम फुटला. त्यातूनही काही जागांवर तडजोड होणे अशक्य बनल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्षांच्या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची संख्या ७९ झाली आहे. म्हणजेच एकूण चौदा जागांवर अधिकचे उमेदवार उभे आहेत.
वाचा : इचलकरंजीत ११ अर्ज अवैध; छाननीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फोडला घाम
त्याचबरोबर मागणी करूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या दहाजणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचाही प्रभागातील जनसंपर्क हा पक्षाचा निष्ठावंत म्हणूनच आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक उमेदवार उभारलेल्या सर्व प्रभागांत महायुतीची अडचण होणार आहे.
त्यांना रोखण्यासाठी आता माघारीचे एकच अस्त्र शिल्लक आहे. त्यासाठी मनधरणी व तडजोडीचे राजकारण करावे लागणार आहे. स्वीकृतसह अन्य काही पदांच्या नियुक्तीचे आश्वासन कितपत काम करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याव्यतिरिक्त काही क्लृप्त्या पक्षश्रेष्ठींना राबवाव्या लागणार आहेत; अन्यथा महायुतीमधील अंतर्गत मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा तिसऱ्यालाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रभागात एकपेक्षा अधिक उमेदवार
प्रभाग क्रमांक १४ ब मध्ये मेघा भोसले (भाजप) आणि उमा गौड (शिंदेसेना), प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये राजू पुजारी (भाजप), रवींद्र लोहार (शिंदेसेना), १५ क मध्ये तेजश्री भोसले (भाजप), मनीषा पाटील (शिंदेसेना), १५ ड मध्ये संतोष शेळके (भाजप), प्रकाश पाटील (शिंदेसेना). प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये प्रियांका इंगवले (भाजप), मनाली नंदूरकर (राष्ट्रवादी), प्रभाग ३ ब मध्ये योगेश पाटील (भाजप), शिवाजी शिंदे (राष्ट्रवादी), प्रभाग ३ क मध्ये सरिता आवळे (शिंदेसेना), प्रियदर्शनी बेडगे (राष्ट्रवादी), प्रभाग ३ ड मध्ये राजू चव्हाण (भाजप), अशोक जांभळे (राष्ट्रवादी),
प्रभाग ९ ब मध्ये ध्रुवती दळवाई (भाजप), तनुजा माने (राष्ट्रवादी), प्रभाग १० ड मध्ये तानाजी पोवार (भाजप), अमित गाताडे (राष्ट्रवादी), प्रभाग ११ अ प्रदीप धुत्रे (भाजप), इस्माईल समडोळे (राष्ट्रवादी), प्रभाग ११ ब वैशाली मोहिते (भाजप), शबाना समडोळे (राष्ट्रवादी), प्रभाग ११ क सारिका पाटील (भाजप), लक्ष्मी बडे (राष्ट्रवादी), प्रभाग ११ ड राजू बोंद्रे (भाजप), शशिकांत देसाई (राष्ट्रवादी) असे महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत.
भाजपमधील अपक्ष उमेदवार
पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या रागातून भाजपच्या महिला शहर अध्यक्ष अश्विनी कुबडगे, पूनम जाधव, हेमंत वरुटे, मोहन बनसोडे, कपिल शेटके, अरुणा काजवे, मारुती पाथरवट, प्रमोद पाटील, दीपाली हुक्कीरे, सचिन हुक्कीरे, आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अन्य पक्षांतून उमेदवारी
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या संजय गेजगे, अभय बाबेल, महावीर जैन, संतोष जैन, संध्या बनसोडे, वर्षा कांबळे, आदी उमेदवारांनी अन्य पक्षांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.