लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:22 IST2026-01-03T14:21:00+5:302026-01-03T14:22:01+5:30
राहुल आवाडे अभी तो बच्चा है; खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला
कोल्हापूर : राज्यसभेच्या खासदारांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवं. यांचं ऐकून जर कोल्हापूरकर मतदान करत असतील तर त्यांचा दोन लाख ७० हजारांनी कार्यक्रम झाला नसता, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना शनिवारी टोला लगावला. खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार पाटील म्हणाले, आमच्यावर टीका करण्याआधी धनंजय महाडिक यांनी भूतकाळात जाऊन पाहवे. २००५ मध्ये ताराराणी आघाडीच्या माध्यमातून तेही महापालिकेच्या सत्तेत होते. त्यामुळे बोलण्याआधी त्यांनी तारतम्य बाळगावे. आम्ही टॅगलाइनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने बोलत आहोत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर बोलत आहेत.
आमची महापालिकामध्ये सत्ता होती त्यावेळी हसन मुश्रीफ सोबत होते. राष्ट्रवादीचा महापौर दोन वर्षे होता. शिवसेना आमच्यासोबत होती. परिवहन सभापतिपद त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांच्यावर बोलता येत नसल्याने ते माझ्यावर टीका करत असावेत असा टोला त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला.
रंकाळ्यावरचे ऑडिट मुश्रीफ यांनी करावे
रंकाळ्यावर बसवलेले कारंजे साडेतीन कोटींचे आहेत. याच कारंजांसाठी कागलमध्ये ५५ लाख रुपये खर्च आला आहे. रंकाळ्यावरील सुशोभीकरणाच्या कामातील अनियमिततेचे ऑडिट आता मुश्रीफ यांनी करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
बोगस कामाची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे
महापालिकेतील प्रशासकांवर आमचा कंट्रोल आहे, असे पालकमंत्री म्हणतात. तर मग गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये झालेल्या बोगस कामाची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे, असे आमदार पाटील म्हणाले.
कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशीच लढत
कोल्हापूरची निवडणूक कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशीच आहे, असे सांगत आमदार पाटील यांनी जनसुराज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला.
महायुतीचेच उमेदवार बिनविरोध कसे?
महापालिका निवडणुकीत केवळ महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होत आहेत? निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप पद्धतीने वापर केला आहे. निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
राहुल आवाडे अभी तो बच्चा है
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावरून आमदार राहुल आवडे यांनी माझ्यावर टीका केली असली तरी राहुल आवाडे अभी तो बच्चा है।, असे सांगत आमदार पाटील यांनी गेल्या दीड वर्षात हा पाणीप्रश्न का सोडवला नाही, असा सवाल केला.