Ichalkaranji Municipal Election Results 2026: शिव-शाहूच्या आव्हानात भाजपचा विजयी फॉर्म्युला, आवाडे पिता-पुत्र व सुरेश हाळवणकरांची रणनीती यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:36 IST2026-01-17T17:34:55+5:302026-01-17T17:36:31+5:30
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर तोच पॅटर्न भाजपने इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरला. तो फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचा कौल देत जनतेने ...

Ichalkaranji Municipal Election Results 2026: शिव-शाहूच्या आव्हानात भाजपचा विजयी फॉर्म्युला, आवाडे पिता-पुत्र व सुरेश हाळवणकरांची रणनीती यशस्वी
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर तोच पॅटर्न भाजपने इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरला. तो फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचा कौल देत जनतेने ४३ जागांचे स्पष्ट बहुमत दिले. आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या त्रिसुत्री नेतृत्वाखाली आखलेल्या रणनितीपुढे विरोधी शिव-शाहू आघाडीने कडवी झुंज दिली असली तरी त्यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले.
शिंदेसेनेला ३, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला १ व उद्धव सेनेला एका जागेवर विजय मिळाला.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी तब्बल २३० उमेदवार रिंगणात उभारले होते. त्यातून महायुतीने ४७ जागांवर विजय मिळवला. प्रभाग १ आणि २ मध्ये शिव-शाहूने एकहाती सत्ता घेतली. ३ मध्ये मैत्रीपूर्ण लढतीत माजी आमदार अशोक जांभळे यांनी भाजपचे राजू चव्हाण यांचा पराभव केला. प्रभाग १२ मध्ये संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील चारही जागांना अनपेक्षित धक्का बसला.
माणुसकी कामाला आली
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव मदन कारंडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ७ हा आघाडीला कौल देईल, असा बनला होता. अपेक्षेप्रमाणे मतदारांनी आघाडीचे तीन उमेदवार निवडून दिले; पण भाजपच्या प्रमिला रवींद्र जावळे यांच्या गळ्यातही विजयाची माळ घातली. त्यामुळे आघाडीच्या बालेकिल्ल्यात जावळेंनी मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली. माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामाला मतदारांनी साथ दिली.
एकाच कुटुंबातील तिघांचा विजय
शिव-शाहू विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक ८ आणि १६ मधून अनुक्रमे संजय तेलनाडे व त्यांच्या पत्नी स्मिता तेलनाडे, बंधू सुनील तेलनाडे यांनी विजयश्री खेचून आणला. भाजपने या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रीत करून येथील लढत प्रतिष्ठेची केली होती.
एकाच कुटुंबातील तिघांचा पराभव
प्रभाग क्रमांक ५ मधून सुमित सचिन भरते, प्रतीक्षा सचिन भरते आणि सचिन सदाशिव भरते या एकाच कुटुंबातील मुलगा व आई-वडील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांचा सपशेल पराभव झाला.
वडील विजयी, मुलाचा पराभव
माजी आमदार अशोक जांभळे हे प्रभाग क्रमांक ३ मधून व त्यांचे पुत्र व राष्टÑवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढवली. त्यामध्ये अशोक जांभळे यांचा विजय झाला. मात्र, पुत्र सुहास यांना पराभवास सामोरे जावे लागले.
वडील-मुलगी पराभूत
कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे यांना प्रभाग क्रमांक १२ मधून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच त्यांची मुलगी संतोषी संजय कांबळे या प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणुकीला सामोरे गेल्या. त्याही पराभूत झाल्या. बाप-लेकीचा हा पराभव शिव-शाहू आघाडीला धक्का देणारा ठरला.
पती-पत्नी पराभूत
माजी नगरसेवक प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढवली. दोघांचाही पराभव झाला.
पती विजयी, पत्नी पराभूत
प्रभाग क्रमांक १३ मधून अमरजित जाधव विजयी झाले. परंतु प्रभाग क्रमांक १६ मधून मंजुश्री जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले.
पती पराभूत, पत्नी विजयी
प्रभाग क्रमांक ९ मधून माजी आमदार राजीव किसन आवळे यांचे बंधू अब्राहम आवळे यांचा नामुष्कीजनक पराभव झाला. परंतु त्यांच्या पत्नी क्रांती आवळे यांनी दिमाखदार विजय मिळविला. ‘थोडी खुशी थोडा गम’ याचा अनुभव यानिमित्ताने त्यांना आला.
पॅनेलच्या पॅनेल विजयी
भाजप महायुतीचे ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभाग क्रमांक ६, ९, ११, १२, १४, १५ मधील चारीच्या चारी जागा मिळविण्यात महायुतीला यश आले. तर शिव-शाहू विकास आघाडीने प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये चारी जागा राखण्यात यश मिळविले.
दिग्गज माजी नगरसेवकांचा पराभव
भाजप - सुनील पाटील, किसन शिंदे, संजय केंगार, शुभांगी माळी, मंगल मुसळे.
शिंदेसेना - रवी लोहार, प्रकाश पाटील, दिलीप झोळ
शिवशाहू आघाडी संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, अब्राहम आवळे, अनिता कांबळे, राजवर्धन नाईक
लक्षवेधी दिग्गज पराभूत
राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, सागर चाळके यांची मुलगी हिमानी चाळके, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे यांची मुलगी संतोषी कांबळे
शिवाजी पाटील जॉर्इंट किलर
मागील नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार अशोक जांभळे यांना दमछाक करणारे उद्धव सेनेचे शिवाजी पाटील महानगरपालिका निवडणुकीत जॉर्इंट किलर ठरले. त्यांनी धक्कादायकरित्या माजी नगरसेवक सुनील पाटील यांचा पराभव केला.
‘शिव-शाहू’ ची झुंज
भाजप विरोधातील सर्वांना एकत्र करून शिव-शाहू विकास आघाडीने मोट बांधली. सर्व प्रभागांत उमेदवार मिळणार की नाही, असे वाटत असताना ‘शिव-शाहू’ ने कडवी झुंज या निवडणुकीत दिली. ‘शिव-शाहू’ च्या उमेदवारांनी अनेक मातब्बर उमेदवारांचा पराभव केला. ‘शिव-शाहू’ ला उमेदवार मिळणार नाहीत, अशी हवा निर्माण करणाºयांची शिव-शाहू आघाडीने त्यांची हवा काढून घेतली.
हाळवणकरांची ताकद दखलपात्र
प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना हाळवणकर यांना ३ जागा कमी देण्यात आल्या होत्या. तरीही हाळवणकर यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसला. त्यांच्या गटाच्या २२ जागा आल्या, तर आवाडे गटाच्या २१ जागा आल्या. त्यामुळे राज्य पातळीवर हाळवणकर यांची ताकद दखलपात्र ठरली आहे.
पॅनेलच्या पॅनेल विजयी
भाजप महायुतीचे ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभाग क्रमांक ६, ९, ११, १२, १४, १५ मधील चारीच्या चारी जागा मिळविण्यात भाजपला यश आले. तसेच महायुती प्रभाग क्रमांक ३ आणि १० दोन ठिकाणी, तर शिव-शाहू विकास आघाडीने प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये चारी जागा राखण्यात यश मिळविले.