कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी, पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:47 IST2025-09-04T12:47:26+5:302025-09-04T12:47:55+5:30
दुचाकीवरूनच दर्शन घेणाऱ्यांमुळे गर्दी

कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी, पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला
कोल्हापूर : शहर, उपनगर, पेठा, कसबा बावडा येथे बुधवारी गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत अलोट गर्दी झाली होती. अनेकजण कुटुंबांतील सर्व सदस्यांसह, मित्रमंडळींसह गणपती, देखावे दर्शनाचा आनंद घेतला. यामुळे शहरातील सर्वच रस्ते उशिरापर्यंत गजबजून गेले होते. देखाव्याच्या जवळपास खाद्यांचे स्टॉलही फुल्ल होते. गणेश दर्शनानंतर आलेले अनेकजण या स्टॉलवर ताव मारताना दिसत होते.
घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील सार्वजनिक गणपती, देखावा पाहण्यासाठी बहुतांशी जण बाहेर पडले. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली तसा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. गणेश दर्शन सुरळीतपणे पार पडावे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवकाच्या भूमिकेत वावरत होते. गर्दीवर नियंत्रण, देखावे पाहण्यासाठी रांगा लावणे, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी पोलिस मित्राची भूमिका बजावली. रात्री आठ वाजल्या पासूनच शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलू लागले. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पोने लोक गणेश दर्शनासाठी येत राहिले.
कसबा बावडा, शिवाजी पेठ, शुक्रवारपेठ, मंगळवारपेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह विविध पेठा, कसबा बावडा, लाईन बझार, संभाजीनगर येथे दर्शनासाठी संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर दिसत होते. श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणेश दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या. आकर्षक विद्युत रोषणाई आणि लक्षवेधी देखावे असलेल्या मंडळासमोर आबालवृद्धांची संख्या अधिक दिसत होती. अधिक गर्दी असेल्या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना गटागटाने दर्शनासाठी सोडत होते. जिवंत आणि तांत्रिक देखावे असलेल्या ठिकाणी दर्शनासाठी लांबच्या लांब रांग लागत होती. महिला, पुरुषांची रांग वेगळी होती.
दुचाकीवरूनच दर्शन घेणाऱ्यांमुळे
गणेश मंडपासमोर दुचाकी आणायची आणि खाली न उतरता त्यावर बसूनच देखावे पाहायचे, असे करणाऱ्या दुचाकीस्वारामुळे गर्दीत भरच पडत राहिली. गर्दीतून लहान मुलांना दर्शन घेणे अडचणीचे ठरत होते.
सजीव देखाव्यांनी खेचली गर्दी, ऐतिहासिक देखाव्यांतून प्रबोधनाची वाट
स्थानिक आणि हौशी कलाकारांचा सहभाग आणि उपस्थितांचा त्याला मिळणारा भरभरून प्रतिसाद अशा वातावरणात बुधवारी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाचे सजीव देखावे खुले झाले. ऐतिहासिक देखाव्यांनी नागरिकांची गर्दी खेचली आहे. या देखाव्यातून प्रबोधनासह रोमांच उभा करणारा इतिहास अनेकांनी अनुभवला.
रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर युवा मंचने स्वराज्य रक्षक रणरागिणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘ऐतिहासिक कुंकू’ हा देखावा सादर केला. हा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. कपिलतीर्थ मार्केटमधील मित्रप्रेम मंडळाचा ‘शिवछत्रपतींच्या गडकोट-किल्ले संवर्धनावर’ आधारित सजीव देखावा खुला झाला. खरी कॉर्नर शिवाजी पेठ येथील अवचितपीर तालीम मंडळाचा ‘आग्रा दरबाराला शिवछत्रपतींची भेट’ हा देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली. निवृत्ती चौकातील गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनचा सरसेनापती नेताजी पालकर या देखाव्याने नागरिकांची गर्दी खेचली.
कसबा बावडा ठोंबरे गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे ‘शाहिस्तेखानाची फजिती’, राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विवेकानंद मित्र मंडळातर्फे ‘सरसेनापती’ देखावा आकर्षण ठरत आहे. लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘साईची लीला श्रद्धा आणि सबुरी’ या देखाव्याने गर्दी खेचली.
बुधवार पेठेत आकर्षक गणेशमूर्ती आणि वैविध्यपूर्ण विषयांवर देखावे हे उत्सवाचे आकर्षण ठरत आहे. प्राचीन मंदिराच्या प्रतिकृती, कलात्मक गणेशमूर्ती, गुहेतील शिल्पाकृती यंदाच्या उत्सवाचे वेगळेपण दर्शवित आहेत. शहरातील बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांनी आपले देखावे बुधवारपासून खुले केले. देखावे खुले करण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.
मनोरंजनातून प्रबोधन
शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांची मोठी परंपरा आहे. याठिकाणी मनोरंजनातून सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या नाटिका सादर केल्या जातात. शिवकालीन प्रसंगांवर आधारित सजीव देखावे, शहरातील कचरा, पाणी, रस्ते याकडे लक्ष वेधणारे सजीव देखावे नागरिकांसाठी वेगळी पर्वणी ठरत आहेत.