Kolhapur: घराला आग, ७ लाख रुपयांच्या नोटा खाक; आगीत ४० लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:46 IST2025-08-11T15:46:23+5:302025-08-11T15:46:48+5:30
सुदैवाने जीवितहानी झाली नाही

Kolhapur: घराला आग, ७ लाख रुपयांच्या नोटा खाक; आगीत ४० लाखांचे नुकसान
चंदगड : राहत्या घराला आग लागून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, साठवलेले धान्य, काजू, संसारोपयोगी साहित्यासह लागलेल्या आगीत ४० लाखांचे नुकसान झाले. ही घटना कानडी (ता. चंदगड) येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली असून शाॅर्टसर्किटने आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
भात व्यापारी केरबा गुंडू चौगुले व आप्पाजी गुंडू चौगुले यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी वरच्या मजल्यावर अचानक आग लागल्याचे केरबा यांच्या सूनबाईला निदर्शनास आले. तिने आरडाओरडा केला असता गावातील अनेक जण धावून आले. पण लाकडी थाटामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लांबच्या लांब लोळ व धुराचे लोट यामुळे आग विझविताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
सात लाख रुपये, सोन्याचे दागिन्यासह साहित्य जळून खाक
त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात आली. तत्पूर्वी केरबा हे भात व्यापारी असून खरेदी केलेल्या ग्राहकांच्या भाताची रक्कम देण्यासाठी आणलेले रोख सात लाख रक्कम, दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, साठवलेले १० टन भात-नाचणा, काजू, संसारोपयोगी साहित्य, कपडे व घर जळून खाक झाले. या आगीत सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनेचा पंचनामा तलाठी, पोलिस पाटील व पोलिसांनी केला आहे. काजूमुळे आगीचा भडका उडून ग्राहकांच्या धान्याची रोख रक्कम जळाल्याने मोठा फटका बसला आहे.