पालकमंत्री हलगीच्या तालावर थिरकले...सतेज पाटील इचलकरंजीला धावले; मुश्रीफ संपर्कात, क्षीरसागर केंद्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:53 IST2025-12-31T18:51:36+5:302025-12-31T18:53:14+5:30
बंडखोरांची भीती, नाराजी, रुसव्या-फुगव्यांचा खेळ असा श्वास रोखून धरायला लावणारा दिवस असतानाही सर्वच पक्षांमधील नेत्यांनी मात्र नो टेन्शनचा मंत्र अंगीकारत मंगळवारचा दिवस एन्जॉय केला

पालकमंत्री हलगीच्या तालावर थिरकले...सतेज पाटील इचलकरंजीला धावले; मुश्रीफ संपर्कात, क्षीरसागर केंद्रात
कोल्हापूर : एबी फॉर्म हातात येईपर्यंत क्षणाक्षणाला वाटणारी धास्ती, बंडखोरांची भीती, नाराजी, रुसव्या-फुगव्यांचा खेळ असा श्वास रोखून धरायला लावणारा दिवस असतानाही सर्वच पक्षांमधील नेत्यांनी मात्र नो टेन्शनचा मंत्र अंगीकारत मंगळवारचा दिवस एन्जॉय केला. शिंदेसेनेची सर्वस्वी जबाबदारी असलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पदयात्रेत सामील होत लेझीमच्या तालावर मनसोक्त थिरकले.
तर, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसची धुरा वाहणारे पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरची घडी व्यवस्थित बसवत इचलकरंजी महापालिकेत संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी तळ ठोकून बसले होते.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सर्वांत कमी जागा लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हालचालीचा केंद्रबिंदू असलेले मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवारी दिवसभर स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होते. कुणाची बंडखोरी होऊ नये यासाठी ते लक्ष ठेवून होते. दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागरही शेवटच्या दिवशी पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर हजेरी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महापालिका निवडणुकीत महायुतीने शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म देऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी शेवटच्या दिवशी उमेदवारांसह स्थानिक कार्यकर्तेही प्रचंड तणावाखाली होते. नेत्यांनी मात्र, कुणाला उमेदवारी द्यायची हे आधीच फिक्स केल्याने त्यांचा दिवस रोजच्यासारखाच गेल्याचा प्रत्यय आला.
काँग्रेसचे एबी फॉर्म अजिंक्यतारावरून
काँग्रेसने त्यांच्या ६२ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केल्याने यातील बहुतांश उमेदवारांनी सोमवारीच अर्ज दाखल केले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या उमेदवारांना अजिंक्यतारा कार्यालयातून एबी फॉर्म देण्यात येत होते.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांकडे एबी फॉर्म
राष्ट्रवादीचे एबी फॉर्म पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्याकडे होते. मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार त्यांनी दुपारी १२ वाजताच उमेदवारांना हे फॉर्म दिले. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरला.