कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

By पोपट केशव पवार | Published: April 26, 2024 03:39 PM2024-04-26T15:39:43+5:302024-04-26T15:42:39+5:30

‘आम्ही उरलो केवळ आशीर्वादापुरते’ या भूमिकेत शिरलेल्या या ज्येष्ठांची आठवण मात्र शहरापासून गावशिवारापर्यंत प्रत्येक ठिकाणी काढली जात आहे

Former People Representative of Kolhapur District as a Guide | कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

पोपट पवार

कोल्हापूर : कधीकाळी निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून देत जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणाऱ्या अनेक बुजुर्गांना वाढत्या वयामुळे व शारीरिक तंदुरुस्तीअभावी यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून चार हात दूर राहावे लागत आहे. ‘आम्ही उरलो केवळ आशीर्वादापुरते’ या भूमिकेत शिरलेल्या या ज्येष्ठांची आठवण मात्र शहरापासून गावशिवारापर्यंत प्रत्येक ठिकाणी काढली जात आहे. हे बुजुर्ग यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असले, तरी त्यात आपणाला भूमिका बजावता येत नाही, ही खंतही त्यांच्या मनी असणार आहे. 

जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील या ज्येष्ठांचे किस्से जाहीर भाषणात रंगवून सांगण्यापासून ते त्यांच्या कार्यकाळात केलेली कामेही आताच्या लोकसभा निवडणुकीत त्या-त्या पक्षाला उपयोगी पडत आहेत. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यापासून ते माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यापर्यंत जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

कल्लाप्पाण्णांचा चुकत नाही दिनक्रम

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक काळ गाजवला होता. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा संसदेत पोहोचलेले आवाडे सध्या मात्र राजकारणापासून दूर आहेत. वयाची नव्वदी पार केलेले आवाडे यांचा जवाहर साखर कारखाना, डीकेटी या संस्थेत रोजचा एक फेरफटका असतो. राजकारणाची सर्व सूत्रे मुलगा प्रकाश आवाडे व नातवंडांच्या खांद्यावर देत ते सध्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

दिनकरराव मार्गदर्शकाच्या भूमिकेत

राधानगरी-भुदरगड मतदारसंघात दोनवेळा गुलाल लागत विधानसभा गाठणारे माजी आमदार दिनकरराव जाधव सध्या ९३ वर्षांचे आहेत. त्यांच्या गटाची धुरा मुलगा सत्यजित वाहत असून दिनकरराव जाधव यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे.

बजरंगअण्णांचे काय?

वडिलांच्या आमदारकीनंतर राधानगरी मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेले माजी आमदार बजरंग देसाई हेही सध्या वयोमानानुसार राजकीय आखाड्यातून बाहेर पडले आहेत. मुले धैर्यशील व राहुल हेच अण्णांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत.

जयवंतराव आवळे राजकारणापासून दूर

वडगाव या तत्कालीन विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाचवेळा आमदार राहिलेले, लातूरमधून लोकसभेवर गेलेले राज्याचे माजी मंत्री जयवंतराव आवळेही सध्या ८० च्या घरात आहेत. मुलगा राजूबाबा आवळे यांच्याकडे राजकीय सूत्रे देत तेही राजकीय घडामोडींपासून अलिप्त झाले आहेत. इचलकरंजी येथील निवासस्थान आणि सूतगिरणीवर ते नित्यनियमाने कार्यकर्त्यांना भेटत असतात.

संजीवनीदेवी गायकवाड यांची धुरा कर्णसिंह यांच्या खांद्यावर

विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत शाहूवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सक्रिय होत्या. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्या अलिप्त आहेत. पुत्र कर्णसिंह गायकवाड यांच्याकडे त्यांच्या गटाची धुरा आहे.

८३ व्या वर्षीही सरुडकर मुलासाठी धावतायेत

शाहूवाडी मतदारसंघातून दोनवेळा विजयश्री मिळवलेले माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांनी वयाची ८३ पार केली आहे; मात्र मुलगा सत्यजित पाटील यांच्यासाठी ते या वयातही मतदारसंघाची पायधूळ झाडत आहेत.

भरमूअण्णा, संध्यादेवी प्रचारात

माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर हे सध्या प्रचारात सक्रिय आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अशोकराव जांभळेही त्यांच्या गटासाठी राजकीय आखाड्यात तग धरून आहेत.

Web Title: Former People Representative of Kolhapur District as a Guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.